
आजच्या जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. अनेक कंपन्यांमध्ये एआयचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा परिस्थितीत, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी नुकतंच ‘Gen Z’ म्हणजेच सध्याच्या तरुणाईला एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. केवळ एआय टूल वापरता येणं पुरेसं नाही, कारण एआयमुळे अनेक एंट्री-लेव्हल नोकऱ्या म्हणजेच करिअरच्या सुरुवातीला मिळणाऱ्या नोकऱ्या आता वेगाने कमी होत आहेत.
बिल गेट्स यांच्या मते, एआय सिस्टीम सुरुवातीला खूप ‘मजेदार आणि शक्तिशाली’ वाटू शकतात, पण त्याचा परिणाम नोकरीच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच जाणवू लागला आहे. आता नवीन पदवी घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवणं कठीण झालं आहे. कारण कंपन्या रिसर्च, डेटा ॲनालिसिस आणि इतर काही छोटी-मोठी कामं एआयच्या मदतीने करत आहेत. त्यामुळे, ज्या कामातून नव्याने कामाला लागणाऱ्या तरुणांना अनुभव मिळत होता, ती कामं आता एआय करत असल्यामुळे त्यांच्यासाठी संधी कमी होत आहेत.
एका अहवालानुसार, जानेवारी २०२३ पासून अमेरिकेतील एंट्री-लेव्हल नोकऱ्यांची संख्या ३५% नी घटली आहे. फायनान्स आणि कन्सल्टिंगसारखे मोठे क्षेत्रही आता आपलं मूलभूत काम एआय मॉडेल्सकडून करून घेत आहेत. कंपन्यांना आता असे कर्मचारी हवे आहेत, जे एआयने तयार केलेलं काम तपासू आणि सुधारू शकतील, केवळ शिकू शकतील असे नव्हे. ओहायो येथील ‘Futurety’ या कन्सल्टिंग फर्मने तर यावर्षीचा त्यांचा इंटर्नशिप कार्यक्रम रद्द केला आणि सोशल मीडिया कॅम्पेनसाठी चक्क चॅट जीपीटी (ChatGPT) चा वापर केला. यावरून हे स्पष्ट होतं की, तंत्रज्ञान किती वेगाने आपल्या कामाची जागा घेत आहे.
या बदलत्या परिस्थितीमुळे, अनेक ‘Gen Z’ तरुण आता त्यांच्या करिअरचा विचार बदलत आहेत. त्यांना लक्षात आलं आहे की, पारंपरिक कॉर्पोरेट नोकऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा काही विशिष्ट कौशल्याधारित व्यवसायात जास्त संधी आहेत. यामध्ये इलेक्ट्रिशियन (Electrician), प्लंबर (Plumber) किंवा एलिव्हेटर टेक्निशियन यांसारख्या नोकऱ्यांचा समावेश आहे. या कामांना नेहमीच मागणी असते, चांगला पगार मिळतो आणि यासाठी कॉलेजच्या पदवीची गरजही नसते.
बिल गेट्स यांचं असं म्हणणं आहे की, फक्त एआय कौशल्य शिकून फायदा नाही. तरुणांनी नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याबरोबरच भावनिक बुद्धिमत्ता आणि व्यावहारिक कौशल्ये शिकली पाहिजेत. ज्या व्यक्तीमध्ये एआयचे ज्ञान आणि सर्जनशील विचार यांचा उत्तम मेळ साधता येतो, अशाच व्यक्तीला भविष्यात चांगली संधी मिळेल.