
ॲपल कंपनीने भारतात त्यांचे नवीन ओव्हर-इअर हेडफोन्स, एअरपॉड्स मॅक्स 2 लॉन्च केले आहेत. या डिव्हाइसमध्ये मागील मॉडेलच्या तुलनेत अनेक मोठे अपग्रेड्स आहेत, ज्यात नवीन H2 चिप आणि सुधारित ऑडिओ अनुभवाचा समावेश आहे. कंपनीचा दावा आहे की यात अधिक पॉवरफुल ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन आणि स्मार्ट फीचर्स आहेत. याची बॅटरी लाईफ 20 तास आहे. उच्च-स्तरीय वापरकर्त्यांना लक्ष्य करून याचे प्रीमियम डिझाइनही तसेच ठेवण्यात आले आहे. चला तर मग या हेडफोन्सची किंमत आणि उपलब्धता याबद्दल जाणून घेऊयात.
भारतात एअरपॉड्स मॅक्स 2 ची किंमत 67 हजार 900 रूपये ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे ते प्रीमियम हेडफोन रेंजमध्ये येते. हे हेडफोन ब्लू, मिडनाईट, ऑरेंज, पर्पल आणि स्टारलाईट या पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार 25 मार्चपासून ऑर्डर स्विकारल्या जाणार आहेत. मात्र या हेडफोन्सची डिलिव्हरी पुढील महिन्यापासून सुरू होईल. ॲपल आपल्या वापरकर्त्यांना AppleCare+ सर्व्हिस सुद्धा देत आहे, ज्यामध्ये डॅमेज आणि सपोर्टचा समावेश आहे.
नवीन एअरपॉड्स मॅक्स 2 मध्ये ॲपलची H2 चिप आहे. जी आधीच्या H1 चिपपेक्षा अधिक प्रगत मानली जाते. कंपनीच्या म्हणण्यानुसार यामुळे अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन दीडपट अधिक प्रभावी होते. तसेच या हेडफोन्सच्या ट्रान्सपरन्सी मोडमध्येही सुधारणा करण्यात आली आहे, ज्यामुळे बाहेरील आवाज अधिक नैसर्गिक वाटतात. नवीन हाय-डायनॅमिक रेंज ॲम्प्लिफायरमुळे आवाजाच्या गुणवत्तेतही लक्षणीय सुधारणा होते.
एअरपॉड्स मॅक्स 2 मध्ये अनेक नवीन स्मार्ट फिचर्स आहेत, जे त्या हेडफोन्सला आणखी अद्वितीय बनवतात. ॲडॅप्टिव्ह ऑडिओ सभोवतालच्या वातावरणानुसार आवाज आपोआप समायोजित करतो. कॉन्वर्सेशन अवेअरनेस हे फिचर जेव्हा युजर बोलतो तेव्हा म्युजिकचा आवाज कमी करतो. ॲपलच्या बुद्धिमत्तेवर आधारित लाइव्ह ट्रान्सलेशन, वेगवेगळ्या भाषांमध्ये रिअल-टाइम संभाषण सुलभ करण्यास मदत करते.
ॲपलचा दावा आहे की, एअरपॉड्स मॅक्स 2 मध्ये ANC आणि स्पॅशियल ऑडिओसहसुद्धा 20 तासांपर्यंत बॅटरी लाईफ मिळते. फास्ट चार्जिंगलाही सपोर्ट आहे. हे हेडफोन्स USB Type-C द्वारे लॉसलेस ऑडिओ आणि गेमिंगसाठी लो-लॅटेन्सी ऑडिओला सपोर्ट करतात. कंपनीने पुनर्वापर केलेल्या साहित्याचा वापर करून त्यांना पर्यावरणपूरक बनवले आहे.