“या” बॅटरीने फोन चार्ज केला तर तो ५० वर्ष चालेल! कसं चला जाणून घेऊ
बीटावॉल्ट सध्या या बॅटरीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करण्याच्या तयारीत आहे. एकदा का याचं उत्पादन सरस झालं की, ही बॅटरी केवळ प्रयोगशाळेपुरती मर्यादित राहणार नाही, तर आपल्या दैनंदिन तंत्रज्ञानातही वापरली जाऊ शकते. चला जाणून घेऊया नक्की या बॅटरीचा काय फायदा होतो ते..

स्मार्टफोन, ड्रोन किंवा सेन्सर्स वापरत असताना सर्वात मोठा त्रास कोणता वाटतो? अर्थातच – चार्जिंग! वारंवार चार्ज करावी लागणारी बॅटरी ही आजच्या युगात एक सामान्य समस्या झाली आहे. पण याच समस्येवर आता चीनमधील एका स्टार्टअपने जबरदस्त तोडगा काढला आहे. या कंपनीने अशी बॅटरी विकसित केली आहे जी तब्बल ५० वर्षे चार्ज न करता वापरता येणार असल्याचा दावा करत आहे!
कोणती आहे ही कमाल बॅटरी?
बीजिंगमध्ये असलेल्या ‘बीटावॉल्ट’ (Betavolt) या स्टार्टअपने ही बॅटरी तयार केली असून, ही एक न्युक्लियर बॅटरी आहे. “न्युक्लियर” हा शब्द ऐकून कोणाच्या मनात भलेमोठ्या उपकरणाची कल्पना येईल, पण ही बॅटरी एखाद्या नाण्याइतकी लहान आहे!
बीटावॉल्टनं सांगितलं की, ही जगातली पहिली अशा प्रकारची बॅटरी आहे जी इतक्या दीर्घकाळासाठी सतत वीज पुरवू शकते. यामध्ये कोणतीही देखभाल किंवा वारंवार चार्जिंग आवश्यक नाही. यामुळेच ती अत्यंत टिकाऊ आणि विश्वासार्ह मानली जाते.
कुठे वापरली जाईल ही बॅटरी?
ही बॅटरी सध्या प्रामुख्याने एरोस्पेस, AI उपकरणे, मेडिकल डिव्हायसेस, मायक्रो-रोबोट्स आणि सेन्सर्ससाठी वापरण्याचा विचार केला जात आहे. हे उपकरण दीर्घकाळ चालवण्यासाठी जिथं सतत वीज पुरवठा आवश्यक असतो, अशा सर्व क्षेत्रांत ही बॅटरी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
स्मार्टफोनमध्ये केव्हा वापरणार?
सध्या ही बॅटरी मुख्यत: औद्योगिक वापरासाठी तयार होत असली तरी, भविष्यात स्मार्टफोनसाठीही तिचा वापर शक्य होईल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. यावर बीटावॉल्ट काम करत असून, मोबाइलसाठी योग्य आकार व डिझाइन असलेली बॅटरी विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, याची उत्पादन खर्च खूप जास्त असल्याने, सुरुवातीला ती सर्वसामान्य ग्राहकांसाठी महाग असू शकते.
फायदा काय?
जर ही बॅटरी भविष्यात मोबाइलमध्ये आलीच, तर आपल्याला दररोज फोन चार्ज करण्याची गरजच भासणार नाही! शिवाय, ही बॅटरी वर्षानुवर्षे चालत असल्याने वीज बिलातही मोठी बचत होऊ शकते. दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीचं हे तंत्रज्ञान अनेक क्षेत्रांत एक क्रांती घडवून आणू शकतं.
