एसी टायमरमुळे खरंच वीज वाचते का? जाणून घ्या

रात्रभर एसी चालू ठेवण्याऐवजी टाइमर लावल्याने वीज बचत होते आणि बिलात स्पष्ट फरक पडतो. ठराविक वेळेनंतर एसी बंद झाल्यामुळे ऊर्जा खर्च आणि मशीनवरील ताण कमी होतो. मात्र, टाइमर योग्य वेळेस कसा लावायचा याची संपूर्ण माहिती लेखातून जाणून घ्या.

एसी टायमरमुळे खरंच वीज वाचते का? जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Jun 27, 2025 | 11:30 AM

उन्हाळा आला की घराघरात एसीचा वापर झपाट्याने वाढतो. वाढत्या तापमानासोबतच गारव्याची गरजही वाढते, पण यामुळे विजेचं बिल किती वाढेल, ही चिंता प्रत्येकाच्या मनात असते. काहीजण 24×7 एसी वापरतात, तर काही स्मार्ट पर्याय शोधतात त्यापैकीच एक म्हणजे ‘टाइमर’ सेट करणं. अनेकजण रात्री झोपताना एसीसाठी 2-3 तासांचा टाइमर लावतात. पण हा खरोखर उपयुक्त पर्याय आहे का? आणि यामुळं किती वीज वाचते? चला याचा सविस्तर आढावा घेऊ.

एसी टाइमर म्हणजे नेमकं काय?

टाइमर ही एसीमधील एक स्मार्ट फीचर आहे. याच्या मदतीने तुम्ही एसी किती वेळ चालेल याचा सेटअप करू शकता. उदाहरणार्थ, रात्री झोपण्याआधी तुम्ही 3 तासांचा टाइमर लावल्यास, तो 3 तासांनंतर आपोआप बंद होतो. यामुळे एसी रात्रभर चालत नाही, वीज वाचते आणि एसीवर ताण येत नाही.

भारतीय ऊर्जा कार्यक्षम संस्था (BEE) च्या आकडेवारीनुसार, जर एसी 6 ते 8 तास सलग चालविण्याऐवजी फक्त 2-3 तास चालवला गेला, तर एकूण 30 ते 40 टक्क्यांपर्यंत वीज बचत होऊ शकते. ही बचत दररोजच्या वापरातून महिन्याच्या शेवटी हजारो रुपयांपर्यंत जाऊ शकते.

किती वीज आणि पैसे वाचतात?

उदाहरणार्थ, एका 1.5 टन एसीची सरासरी वीज वापर क्षमता प्रति तास 1.5 युनिट्स असते. जर तो 8 तास सलग चालवला, तर सुमारे 12 युनिट्स वीज वापर होतो. पण जर तुम्ही टाइमर वापरून 3 तास वापर केला, तर फक्त 4-5 युनिट्सचा खर्च होतो.

दर युनिट 8 रुपये गृहित धरल्यास, टाइमर वापरल्याने दररोज ₹60-₹90 पर्यंत बचत होते.
महिन्याभरात ही बचत ₹1,800 ते ₹2,700 इतकी होऊ शकते.

एसी टाइमरचे इतर फायदे

1. गारवा टिकून राहतो: एसी बंद झाल्यानंतरही खोलीतील तापमान काही काळ स्थिर राहतं. त्यामुळे तुम्हाला रात्रभर गारवा मिळतो आणि वीज वाचते.

2. कॉम्प्रेसरवर ताण कमी होतो: सतत चालणाऱ्या एसीच्या तुलनेत टाइमर वापरल्यास यंत्रणेवर कमी दाब येतो. त्यामुळे एसीचा लाईफस्पॅन वाढतो.

3. पर्यावरणपूरक वापर: कमी वीज वापरामुळे कार्बन उत्सर्जन कमी होतं आणि पर्यावरण रक्षणात मदत होते.

4. आरामदायक झोप: रात्रभर एसीमुळे खूप थंडी पडण्याची शक्यता असते, जी झोपमोड करू शकते. टाइमरमुळे तापमान नियंत्रित राहतं.

टाइमर योग्य वेळेस कसा लावायचा?

1. झोपण्याच्या 15-20 मिनिटांपूर्वी एसी सुरू करा, जेणेकरून खोली पूर्णपणे थंड होईल. त्यानंतरच टाइमर सेट करा.

2. जर हवामान खूप गरम असेल, तर 3-4 तासांसाठी टाइमर लावा. हवामान सौम्य असल्यास 2-3 तास पुरेसे ठरतील.

3. तुम्ही किती वाजता झोपता आणि किती वेळ शांत झोप लागते, यानुसार टाइमर सेट करा. उदाहरणार्थ, रात्री 11 वाजता झोपत असाल, तर 2 ते 3 तासांसाठी टाइमर लावा, म्हणजे पहाटेपर्यंत खोली थंड राहील.