
दिल्ली : भारतीय सीमेवर लवकरच रोबो पहारा देताना दिसणार आहेत. भारतीय शास्त्रज्ञांनी ‘खामोश प्रहरी’ हे रोबो(Khamosh Prahahri Robo) विकसीत केले आहेत. यामुळे भारतीय सैन्याची ताकद आणखी वाढणार आहे. या रोबोंमध्ये विशिष्ट प्रकारचे सेन्सर असल्याने तात्काळ शत्रूचा वेध घेता येणार आहे. विशेषत: बॉर्डर क्षेत्रावर तैनात असणाऱ्या सैनिकांवर मोठा तणाव असतो. या रोबोमुळे सैनिकांवरील ताण कमी होणार आहे.
भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेले हे रोबो लवकरच सीमेवर पहारा देताना दिसणार आहेत. लष्कराने डीआरडीओच्या मदतीने रेल माउंटेड रोबो विकसीत केले आहेत. या रोबोला ‘खामोश प्रहरी’ असे नाव देण्यात आले आहे. हे रोबो सीमेवरील कुंपणांजवळ तैनात केले जाऊ शकते.
विशिष्ट सेन्सरमुळे हे रोबो काही सेकंदात शत्रूच्या हालचाली टिपू शकतात.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सोमवारी विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वर आधारित 75 संरक्षण तंत्रज्ञान लाँच करणार आहेत. यामध्ये ‘खामोश प्रहरी’चा समावेश आहे.
आतापर्यंत फक्त दक्षिण कोरिया-इस्रायल या देशांनीच अशा प्रकारते रोबो विकसीत केले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या तंत्रज्ञानाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे संरक्षण सचिव डॉ. जय कुमार यांनी सांगितले. सुमारे शंभर तंत्रज्ञान सध्या उत्पादन प्रक्रियेत आहेत.
एआय-आधारित तंत्रज्ञानाचा वापर तिन्ही सेवांमध्ये तसेच निमलष्करी दलांमध्ये वाढेल. यातील अनेक तंत्रे अशी आहेत की ज्याचा वापर सामान्य लोकही करू शकतात. ही उत्पादने स्वयंचलित/मानवरहित/रोबोटिक्स प्रणाली, सायबर सुरक्षा, लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट, कम्युनिकेशन्स इत्यादी क्षेत्रात आहेत.
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पाण्याखालील आवाजाच्या आधारे लक्ष्य आणि हावभाव पाहून शत्रूचा शोध घेणारे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. बीईएलने ही उपकरणे बनवली आहेत. डीआरडीओच्या यंग सायंटिस्ट प्रयोगशाळेने एआय आधारित रडार विकसित केले आहे जे प्रत्येक परिस्थितीत अचूक डेटा प्रदान करेल. बीईएलने समुद्रात टार्गेट ट्रॅकिंग प्रणाली विकसित केली आहे.