मोबाईल नंबर पोर्टेबलिटीच्या कालावधीत मोठी घट, किती शुल्क आकारणार?

| Updated on: Dec 16, 2019 | 11:53 AM

'ट्राय'ने जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार पाच दिवसांत मोबाईल नंबर पोर्ट करणं बंधनकारक राहील.

मोबाईल नंबर पोर्टेबलिटीच्या कालावधीत मोठी घट, किती शुल्क आकारणार?
व्हॉट्सअ‍ॅपने बऱ्याच वेळा या नवीन स्टोरेज मॅनेजमेंट टूलची चाचणी केली आहे. काही बीटा वापरकर्ते आधीपासूनच या सुविधेचा लाभ घेत होते.
Follow us on

मुंबई : मोबाईल नंबर पोर्टेबलिटी आजपासून (16 डिसेंबर) अधिक वेगवान होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार पाच दिवसांत मोबाईल नंबर पोर्ट करणं बंधनकारक राहील. आतापर्यंत मोबाईल नेटवर्क कंपन्यांना नंबर पोर्ट (Mobile Number Portability TRAI Rules) करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली जात होती.

मोबाईल नंबर पोर्टेबलिटी म्हणजे काय?

ग्राहक त्यांच्या विद्यमान मोबाईल ऑपरेटरवर समाधानी नसतील किंवा इतर कोणत्याही कारणास्तव त्यांना मोबाईल ऑपरेटर बदलायचा असेल, तर ‘मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी’मुळे त्यांना एका मोबाइल ऑपरेटरकडून दुसर्‍यावर शिफ्ट होण्याची परवानगी मिळते. भिन्न ऑपरेटरच्या नेटवर्कवर पोर्ट केल्यावरही ग्राहकाचा मोबाइल क्रमांक तोच राहतो.

पोर्टिंग करण्यास किती वेळ लागतो?

‘ट्राय’ने आपल्या नवीन मार्गदर्शक सूचनांद्वारे केलेला सर्वात मोठा बदल म्हणजे दुसऱ्या नेटवर्कवर पोर्टिंगसाठी लागणाऱ्या दिवसांची संख्या कमी झाली आहे. पूर्वी, दुसर्‍या नेटवर्कवर पोर्ट करण्यास 15 दिवस लागत होते, परंतु आता ते कमी करुन तीन ते पाच कार्यालयीन दिवस (वर्किंग डेज) केले गेले आहेत.

‘ट्राय’च्या नियमावलीनुसार, त्याच सर्कलमध्ये किंवा एलएसए (परवानाधारक सेवा क्षेत्र) असलेल्या दुसर्‍या ऑपरेटरला पोर्ट करण्यासाठी तीन कार्यालयीन दिवस लागतील. दुसर्‍या एलएसएला पोर्ट करण्यास कामकाजाचे पाच दिवस लागतील. मात्र जम्मू-काश्मीर, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांत पोर्टिंग प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 15 दिवसच लागतील.

मोबाईल नंबर पोर्ट कसा करावा? (Mobile Number Portability TRAI Rules)

• मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी, वापरकर्त्यांना यूपीसी (युनिक पोर्टिंग कोड) आवश्यक असतो.

• यूपीसी जनरेट करण्यासाठी ‘PORT’ हा शब्द त्यानंतर <स्पेस> आणि पोर्ट करायच्या दहा-अंकी मोबाइल नंबर टाईप करुन 1900 या क्रमांकावर एसएमएस करा.
उदा. PORT<Space><1234567890>

• एसएमएसच्या माध्यमातून ग्राहकाला यूपीसी प्राप्त होईल. सर्व परवानाधारक सेवा क्षेत्रांमध्ये हा कोड चार दिवसांसाठी वैध असेल. जम्मू-काश्मीर, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांत हा कोड 30 दिवस वैध असेल.

• त्यानंतर, ग्राहकाला आपला मोबाइल नंबर ज्या ऑपरेटरवर पोर्ट करण्याची इच्छा आहे, त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रात जाणे आवश्यक आहे.

• कस्टमर अॅक्विझिशन फॉर्म (CAF) आणि पोर्टिंग फॉर्म भरल्यानंतर ग्राहकांना KYC डॉक्युमेंट्स सादर करावे लागतील. सोबतच पोर्टिंगचे शुल्कही भरावे लागतील.

• कागदपत्रे स्वीकारल्यानंतर, ग्राहकाला नवीन सिमकार्ड जारी केले जाईल आणि पोर्टिंग विनंती मान्य झाल्याची पुष्टी देणारा मेसेज प्राप्त होईल.

• एसएमएसमध्ये पोर्टिंगची (Mobile Number Portability TRAI Rules) तारीख आणि वेळ याचीही माहिती नमूद केली असेल

पोर्टिंग शुल्क किती आणि सेवेत व्यत्यय येणार का?

प्रत्येक पोर्टिंग विनंतीसाठी 6.46 रुपये शुल्क आकारले जाते. ‘ट्राय’च्या माहितीनुसार पोर्टिंगच्या तारखेला रात्रीच्या वेळी सुमारे चार तास सेवा खंडित होईल.

पोर्टिंग विनंती रद्द करता येईल का?

हो, एसएमएस पाठवून ग्राहक त्यांची पोर्टिंग विनंती मागे घेऊ शकतात. त्यासाठी ‘CANCEL’ त्यानंतर स्पेस आणि पोर्टिंगची विनंती केलेला दहा-अंकी मोबाइल नंबर 1900 क्रमांकावर पाठवावा. रद्द करण्याची मागणी ही पोर्टिंग विनंती (Mobile Number Portability TRAI Rules) सबमिट केल्याच्या 24 तासांच्या आत करावी.

हेही वाचा : Whatsapp मध्ये कॉल वेटिंगचे नवं फीचर लाँच