
काहीवेळा आपल्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात, ज्यासाठी आपण कधीही तयार नसते. विशेषतः काही परिस्थिती अशा निर्माण होतात की, इच्छा असूनही आपण काहीच करू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहोत, जी विमान प्रवास करणाऱ्यांना घाबरवून टाकेल. कल्पना करा, तुम्ही 6 तासांच्या फ्लाइटमध्ये आहात आणि तुम्हाला समजतंय की जिथे तुम्ही बसला आहात, तिथे आणीबाणीच्या वेळी टॉयलेटही वापरता येणार नाही.
बालीहून ब्रिसबेनला जाणाऱ्या व्हर्जिन ऑस्ट्रेलियाच्या फ्लाइटमध्ये असंच काहीसं घडलं, जे कल्पनेच्या पलीकडचं आहे. कोणताही प्रवासी असा अनुभव घेऊ इच्छिणार नाही. 6 तासांचा प्रवास विमानात बसलेल्या प्रवाशांसाठी एखाद्या शिक्षेपेक्षा कमी नव्हता. जेव्हा प्रवाशांना कळलं की टॉयलेट वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे, तेव्हा ते खूपच असहय्य वाटू लागले.
स्वागत आहे, पण टॉयलेटपासून दूर राहा
ही फ्लाइट बोइंग 737 मॅक्स 8 विमानाने गुरुवारी दुपारी बालीहून ऑस्ट्रेलियाच्या ब्रिसबेनसाठी उड्डाण केले होते. उड्डाण सुरू होण्यापूर्वीच विमानातील मागील टॉयलेट खराब झाले होते, परंतू इंजिनीअरिंग सपोर्ट नसल्यामुळे फ्लाइट रद्द करण्यात आली नाही आणि उड्डाण वेळेवर सुरू झालं. अडचण तेव्हा वाढली, जेव्हा प्रवासाच्या मध्यावर विमानातील उरलेली दोन टॉयलेट्सही खराब झाली. आता परिस्थिती अशी होती की विमानात एकही टॉयलेट कार्यरत नव्हतं आणि एअर होस्टेस लोकांना टॉयलेटमध्ये जाण्यास मनाई करत होत्या.
प्रवाशांना दिल्या बाटल्या
अशा परिस्थितीत प्रवाशांना नाईलाजाने बाटल्यांमध्ये किंवा आधीपासूनच घाण असलेल्या टॉयलेटचा वापर करण्यास सांगण्यात आलं. याच दरम्यान एका वृद्ध महिला प्रवाशाला स्वतःला रोखता आलं नाही आणि तिने आपल्या कपड्यांमध्येच टॉयलेट केली. एका प्रवाशाने ऑस्ट्रेलियन मीडियाला सांगितलं की, क्रूने आम्हाला सांगितलं की बाटल्यांमध्ये लघवी करा किंवा जे टॉयलेट आधीपासून घाण आहेत, त्यांचाच वापर करा. फ्लाइटच्या शेवटच्या तीन तासांत विमानात लघवीचा दुर्गंध पसरला, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली.
प्रवाशांना मिळेल फ्लाइट क्रेडिट
विमानात प्रवास करणाऱ्या लोकांनी हा अनुभव अपमानजनक आणि असह्य असल्याचं सांगितलं. या घटनेनंतर व्हर्जिन ऑस्ट्रेलियाने माफी मागताना म्हटलं की, त्यांना या घटनेबद्दल लाज वाटते. ही एक अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती होती, ज्याला आमच्या क्रूने हाताळण्याचा पूर्ण प्रयत्न केला. यासोबतच एअरलाइनने असंही सांगितलं आहे की, सर्व प्रवाशांना फ्लाइट क्रेडिट दिले जाईल आणि या घटनेसंदर्भात त्यांच्याशी वैयक्तिकरित्या संपर्क साधला जाईल.