CCTV : बिबट्या आहे की सनी देओल ?..दूध डेअरीत घुसला आणि काच फोडून…

सदाफळ यांच्या लॅबचे मोठे नुकसान झाले आहे. बिबट्यांचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

CCTV : बिबट्या आहे की सनी देओल ?..दूध डेअरीत घुसला आणि काच फोडून...
| Updated on: Mar 12, 2025 | 4:04 PM

एकीकडे मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढत चालला आहे.बिबट्याने अचानक एका दूध डेअरीत प्रवेश केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या बिबट्याच्या प्रवेशाने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरातील बिबट्याच्या वावराने शेतकरी दहशतीखाली आले आहेत. कारण शेतीच्या कामानिमित्ताने रानात वारंवार जावे लागत असल्याने या शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. वनसंरक्षण अधिकाऱ्यांना यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता शहरात एका बिबट्याने थेट एका दूध डेअरीत प्रवेश करत धुडगूस घातल्याची घटना घडली आहे.या बिबट्याच्या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. दूध डेअरीच्या लॅबमध्ये घुसून बिबट्याने उपकरणांची तोडफोड केली आहे. नगर शहरातील राहाता शहरातील पंचकृष्णा डेअरी येथे आज सकाळी ६ वाजताच्या दरम्यान बिबट्या शिरल्याची घटना उघडकीस आली आहे. या परिसरात दोन बिबट्यांची झुंज सुरू असतानाच त्यातील एक बिबट्या थेट सुनील सदाफळ यांच्या पंचकृष्णा दूध डेअरीत घुसल्याचे उघड झाले.

येथे पाहा व्हिडीओ –

या बिबट्याची चाहूल कुत्र्यांना लागताच त्यांनी जोरजोरात भुंकण्यास सुरुवात केली. तेव्हा गेट जवळ झोपलेल्या सुरक्षा रक्षकाला जाग आली आणि त्याच्या समोर थेट बिबट्याचे दर्शन झाले.बिबट्याच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. बिबट्याने डेअरीच्या लॅबमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या धक्क्याने अनेक उपकरणे तुटली आहेत. मात्र बाहेर पडण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने बिथरलेल्या बिबट्याने कार्यालयाच्या दरवाजाच्या जाड काचेला धडका घेत काच फोडली. आणि त्यानंतर त्याने बाहेर पळ काढल्याचे उघड झाले आहे. यावेळी बाहेर जमा झालेल्या लोकांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न या बिबट्याने केला. मात्र, सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. मात्र, सदाफळ यांच्या लॅबचे मोठे नुकसान झाले आहे. राहाता तालुक्यात बिबट्यांचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.