
लग्नानंतर जोडप्यांना मधुचंद्राचे वेध लागतात. सुखी दाम्पत्य जीवनासाठी दोघांचे स्वप्न असतात. हनिमून कुठे करायचा, यावर दोघांची चर्चा होते. एखादं डेस्टिनेशन ठरतं. अथवा काही जण थंड हवेच्या ठिकाणी जातात. या कहाणीत ही असेच घडले. पहिल्या लग्नाचे सुख न मिळालेले हे दोघे जीव दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकले. पतीचे तर मोठी स्वप्न होती. लग्नानंतर तीन दिवस घरात पत्नी सोबत होती. त्यामुळे त्याने मधुचंद्र दूर कुठेतरी साजरा करण्याची स्वप्न रंगवली होती. पण त्याच्या स्वप्नांना असा सुरूंग लागेल याची त्याला कल्पनाच नव्हती…
तर ही सत्य घटना घडली आहे बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये. सीतामढी जिल्ह्यातील अमित कुमार याचे लग्न 21 फेब्रुवारी रोजी धूमधडाक्यात झाले. शिवहर जिल्ह्यातील बसंतपट्टी परिसरातील खुशबू कुमारी हिच्यासोबत अमितचे लग्न झाले. लग्नानंतर ती तीन दिवसांपासून सासरी होती. त्यानंतर त्यांना 24 फेब्रुवारी रोजी मधुचंद्र साजरा करण्यासाठी बोकारो स्टील सिटीमध्ये जायचे होते. त्यांचे सर्व प्लॅनिंग ठरले होते. घरातही आनंदाचे वातावरण होते.
रेल्वे स्टेशनवरून नवरी गायब
24 फेब्रुवारी रोजी अमित आणि खुशबू हे बोकारो स्टील सिटी येथे जाण्यासाठी मुझफ्फरपूर रेल्वे स्टेशनवर दाखल झाले. तिथेच पत्नी खुशबूने पती अमितला खतरनाक सरप्राईज दिले. ही भेट त्याला आयुष्यभर लक्षात राहली. प्लॅटफॉर्मवर रेल्वे येताच अमित हा पुढे धावला. या ठिकाणी रेल्वेला जास्त थांबा नव्हता.
अमित रेल्वे चढला. पण त्याला खुशबू काही मागे आलेली दिसली नाही. त्यामुळे त्याने ट्रेनच्या डब्ब्यात तिला शोधले. त्याला वाटले की ती चुकीच्या डब्यात बसली असावी. पण त्याला ती कोणत्याच बोगीत दिसली नाही. त्यामुळे अमित सुद्धा रेल्वेतून उतरला. त्याने स्टेशनवर तिचा शोध घेतला. त्याला कळलेच नाही की, आतापर्यंत सोबत असणारी खुशबू अचानक कशी गायब झाली?
प्रियकरासोबत रफ्फूचक्कर
दोन ते तीन दिवसानंतर अमितला पत्नीविषयी जी माहिती मिळाली, त्याने मोठा धक्का बसला. अमित आणि खुशबू या दोघांचे पण हे दुसरे लग्न होते. विशेष म्हणजे खुशबू हिच्या मर्जीनेच सीतामढी येथील जानकी मंदिरात दोघांचे लग्न झाले होते. पहिल्या लग्नाची कटुता घालवण्याची संधी मिळाल्याचे दोघांचे मत होते. पण खुशबू मुझफ्फरपूर येथील रेल्वे स्टेशनवर तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे अमितला कळाले.
अगोदरच ठरला प्लॅन
सुरुवातीला आपल्याला लोक नाव ठेवतील म्हणून अमितने बोभाटा केला नाही. पण पत्नीची चाल लक्षात आल्यावर त्याने मनाचा हिय्या केला आणि 1 मार्च रोजी मुझफ्फरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पत्नीचा कारनामा समोर आला. तिने अमितच्या मोबाईलवरूनच प्रियकराला फोन लावल्याचे त्याच्या लक्षात आले. प्लॅन करून ती पळाल्याचे त्याच्या लक्षात आले. सारण या ठिकाणी ती प्रियकरासोबत राहत असल्याची माहिती पण त्याला मिळाली. तिने काही रक्कम आणि 50 ते 60 हजार रूपयांचे दागिने पण सोबत नेले.