
पती आणि पत्नी आणि वो अशी तिकडम, एखाद्या नात्यात दिसून येते. पण जर ही व्यक्ती नात्यातीलच असेल तर मग दोन्ही बाजूची कुटुंब गोत्यात येतात. कोणाला काय करावे ते सुचत नाही. करणारे बिनधास्त आणि नातेवाईकांच्या डोक्याला ताप असा हा मामला असतो. याप्रकरणात ही काही असेच झाले. मोठ्या बहिणीच्या नवऱ्याशी लहान बहिणीचे सूत जुळले. त्यामुळे सर्वच नातेवाईक धक्क्यात आहेत. इतकेच काय, पोलिसांना सुद्धा या प्रकरणात कोणता मार्ग काढावा हे काही सुचत नाहीये.
4 महिन्यापूर्वी पळाले घरातून
उत्तर प्रदेशातील मथुरा येथील ही प्रेम कहाणी व्हायरल झाली आहे. करनाल येथील एका महिलेचे 12 वर्षांपूर्वी नौहझील पोलीस ठाण्यातंर्गत येणार्या गावातील तरुणाशी तिचे लग्न झाले होते. त्यांना दोन मुलं आहेत. तर तिची लहान बहिणी, तिचे पण लग्न झाले आहे. तिला सुद्धा दोन मुलं आहेत. पण अचानक जीजाजी आणि या मेव्हणीमध्ये मधुर संबंध जुळले. ही गोष्ट कुणाच्याच लक्षात आली नाही. दोघांनी हे प्रकरण समोर येणार नाही याची दक्षता घेतली. अगोदर बहिणीचा नवरा गायब झाला. त्यानंतर काही दिवसांनी लहान बहीण गायब झाली. त्यामुळे घरच्यांना हा प्रकार लक्षात आला नाही. चार महिने हे दोघे विविध ठिकाणी फिरले. त्यांनी सातत्याने त्यांचा ठिकाणा बदलला.
थेट विट भट्टीवर
आपला ठावठिकाणा मिळूच नये यासाठी या दोघांनी अशी जागा निवडली जिथे त्यांचे नातेवाईक कधी शोधूच शकणार नाही. या दोघांनी रायपूर जवळील एका विट्ट भट्टीवर मजूर म्हणून काम सुरू केले. तिथे काही कमाई करून हे जोडपे पुढे दुसरीकडे नोकरी शोधणार होते. तोपर्यंत लपण्याचे ठिकाण आणि पोटाची खळगी भरण्यासाठी दोघांनी अशी शक्कल लढवली होती. पण कुठून तरी ही बाब मेव्हण्याच्या लक्षात आली.
प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
दोघे शिक्षित असूनही मजूरी करत असल्याचे मेव्हण्याच्या कानावर आल्यानंतर तो विट भट्टीवर पोहचला. त्याने दोघांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. दोघांच्या मुलांचा विचार करण्याची शपथ घातली. पण दोघेही एकमेकांना सोडणार नसल्याचे हद्द धरून बसले. मेव्हण्याने मग भाऊजीला हाणले. पण उपयोग झाला नाही. उलट विटभट्टी मालकाने पोलीस बोलावले. आता पोलिसांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. पण मेव्हणी तयार झाली नाही. तिने भाऊजीसोबतच संसार करण्याचे सांगितले. अद्याप तरी या प्रकरणावर तोडगा निघाला नसल्याचे समजते.