
तर इतर गावांप्रमाणेच या ही गावात रोजचे रहाटगाडे सुरू होते. शेतीची, मशागतीच्या कामातून फुरसत काढत गावाच्या पारावर गप्पा मारत. या गप्पातून सर्वांच्या लक्षात आलं की, गावातून कोणाची तरी कोंबडी गायब तर कोणीची शेळी गायब झाली आहे. मग वरचेवर हा प्रकार वाढू लागला. सुरुवातीला गावकऱ्यांना हे गावातीलच कुणा भुरट्याचे काम असावे असे वाटले. पण तरीही छडा लागेना. तेव्हा मग पहारा देण्यात आला. तेव्हा जे सत्य समोर आले. त्याने गावकरी उडालेच. काय घडलं त्या गावात?
बिहारमधील पश्चिमी चंपारण या भागात बगहा हे गाव आहे. या गावात कधी नव्हे ते गावकरी इतके भयभीत झाले. कारण ही तसेच होते. या गावात भला मोठा अजगर समोर आला. हा अजगर 20 फुटांहून सुद्धा लांब होता. त्याला पाहताच अनेकांची बोबडी वळाली. काहींना घाम फुटला. काहींनी तर बोंब ठोकत धूम ठोकली. पण गावातील काही जिगरबाजांनी मनाचा हिय्या करत त्याला पकडलेच. आत अजून एखादा अजगर गावात लपून तर बसला नाही ना, याची गावकऱ्यांनी पंचक्रोशीत फिरून पहाणी केली.
घराच्या मागे शोधले लपण्याचे ठिकाण
गावातील संजय कुमार नावाच्या युवकाच्या घरामागे हा अजगर लपला होता. गावात गेल्या काही दिवसांपासून कोंबड्या आणि बकऱ्या गायब होण्याचे कारण त्याला पकडल्यानंतर गावकऱ्यांच्या लक्षात आले. अजगरासाठी हे गाव म्हणजे जणू कुरणच झाले होते. रात्रीच्या वेळी तो सावज पकडायचा आणि दिवसा या घरामागील दाट जागेत लोळत पडायचा. कोणतेही लहान मुलं अथवा माणसाला त्याने इजा केली नाही. पण कदाचित एखाद्या लहान मुलावर त्याने हल्ला केला असता तर, या विचारानेच गावकरी गलितगात्र होतात.
कोंबड्या, बकऱ्या गायब
बगहा येथील रहिवाशी परिसरातच या अजगराने स्वतःचे खास ठिकाण शोधले होते. दिवसभर वर्दळ आणि गजबज असल्याने तो दिवस निपचीत पडून राहत असे. रात्र झाली की मात्र मग तो सावज टिपण्यासाठी बाहेर पडत असे. गेल्या 6 महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. गावकरी कोंबड्या आणि बकऱ्या कोण चोरून नेते या विचाराने हैराण झाले होते. भुरट्या चोरांवर त्यांनी पाळत सुद्धा ठेवली. पण त्यांनी कोंबड्या चोरल्या नसल्याचे समोर आले. त्यानंतर मग रात्री जागता पहारा ठेवला. तेव्हा हा अजगर दिसून आला. हा दानव गेल्या सहा महिन्यांपासून गावात असल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली.