
राज्यभरातून विरोध झाल्यानंतर राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राअंतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय लागू करण्याचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले. सरकारने प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचीही घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाचे संपूर्ण राज्यात स्वागत करण्यात आले. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यापारी महिला मराठी लोकांना धमकी देताना दिसत आहे.
या व्हायरल व्हि़डिओची टीव्ही9 मराठी पुष्टी करत नाही. पण हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओत महिलेच्या विधानाने सर्वच आवाक् झाले आहेत. एका व्यापारी सभेतील महिलेच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. या सभेत तिने मराठी माणसांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली, ज्यामुळे दोन भाषिकांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ यूट्यूबवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती खुलेआम मराठी माणसाला धमकी देताना दिसत आहे.
वाचा: चंद्राचे हस्त नक्षत्रात गोचर! ‘या’ 3 राशींच्या संपत्तीत आणि सुखात अचानक वाढ
काय आहे व्हिडीओ?
व्हायरल व्हिडीओमध्ये, संबंधित महिला हिंदी भाषेत व्यापारी सभेत बोलताना दिसत आहे. ती व्यापाऱ्यांना म्हणते की, आपण दुकाने दोन-चार दिवस बंद ठेवू म्हणजे लॉकडाऊनसारखे हाल होतील मराठी माणसाचे. तिच्या या वक्तव्यानंतर सभेत उपस्थित असलेले सर्व व्यापारी टाळ्यांचा कडकडाट करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ यूट्यूब शॉर्ट्सवर अपलोड झाल्यापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. ‘बाई तुझी दुकानं खुशाल बंद करुन जा… मरु देत आम्हाला उपाशी’ अशा शब्दात नेटकऱ्यांनी या बाईला सुनावले आहे.
वादाची पार्श्वभूमी
अमराठी व्यापाऱ्यांची एक सभा पार पडली. त्यातील हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जातं. पण तो कधीचा आहे याची पुष्टी होऊ शकलेली नाही. सूत्रांनुसार, सभेत स्थानिक व्यापारी धोरणे आणि बाजारातील स्पर्धा यावर चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान, संबंधित महिलेने हिंदी भाषेच्या वादावरुन आक्षेपार्ह टिप्पणी केली. तिच्या वक्तव्याचा संदर्भ नेमका काय होता, याबाबत स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, तिच्या धमकीच्या स्वरूपामुळे मराठी समुदायात संतापाची लाट पसरली आहे.