चमत्कारिक लहानगा : अभिज्ञ आनंद याच्या भविष्यवाण्या एका मागून एक कशा ठरत आहेत खऱ्या

Abhigya Anand predictions : नास्त्रेदमस, बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यांनी अनेकांचे मनोरंजनच नाही तर त्यांना अंतर्मुख केले आहे. एक महिन्यापूर्वी म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपाचे या मुलाने अगोदरच भाकीत केले होते. कोण आहे छोटा भविष्यवेत्ता?

चमत्कारिक लहानगा : अभिज्ञ आनंद याच्या भविष्यवाण्या एका मागून एक कशा ठरत आहेत खऱ्या
अभिज्ञ आनंदची भविष्यवाणी
Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: May 02, 2025 | 3:10 PM

थायलंड आणि म्यानमार या देशांना भूकंपाने मोठा हादरा दिला. या विनाशकारी भूकंपाची भविष्यवाणी भारतातील या छोट्या भविष्यवेत्त्याने अगोदरच केली होती. ज्योतिषशास्त्रातील आकडेमोडीनंतर त्याने याविषयीचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर पोस्ट केल्याचा दावा करण्यात येत आहे. अनेकांना या मुलाच्या भविष्यवाण्या एका मागे एक खशा खऱ्या ठरत आहेत, याचे फार कोडकौतुक वाटत आहे. त्याने कोरोना महामारी, रशिया-युक्रेन युद्ध, हमास-इस्त्रायल संघर्षावर अचूक भाष्य केल्याचा दावा करण्यात येत आहे.

कोण आहे अभिज्ञ आनंद?

अभिज्ञ हा 20 वर्षांचा तरुण आहे आणि 11 व्या वर्षांपासून ज्योतिष विद्येचा अभ्यासक आहे. तो मूळचा कर्नाटकातील म्हैसूर येथील रहिवाशी आहे. तो सर्वात कमी वयाचा ज्योतिषी आहे. त्याने अवघ्या 7 व्या वर्षी भगवत गीता मुखोद्गत केली आहे. तो लहानपणापासून संस्कृत भाषा शिकत आहे. त्याच्या आईने त्याला नेहमी साथ दिली. अभिज्ञ याचे युट्यूबवर चॅनल आहे. त्यावर त्याने अनेक व्हिडिओज अपलोड केले आहेत. त्यात त्याने अनेकदा भविष्यवाण्या सुद्धा केल्या आहेत.

टीव्ही 9 सोबत एका खास चर्चेत त्याने ज्योतिषी आणि संस्कृताचा मार्ग निवडण्यासाठी भगवान कृष्णाने मार्गदर्शन केल्याचे सांगितले. प्राजना ज्योतिष या स्वत:च्या संस्थेच्या माध्यमातून तो 1200 मुलं आणि 150 संशोधकांना शिकवतो. या संस्थेची सुरुवात त्याने 2018 मध्ये केली होती. अभिज्ञ याने केवळ 12 व्या वर्षी वास्तू शास्त्र या विषयात पदवी मिळवली आहे.

शक्तिशाली भूकंप

थायलंड आणि म्यानमारमध्ये शक्तिशाली भूकंप आला होता. थायलंड आणि म्यानमारमध्ये मार्चमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप आला होता. बँकॉकमधील एक बांधकाम होत असलेली बहुमजली इमारात कोसळली होती. या भूकंपात 1000 हून अधिक लोकांचा जीव गेला. तर 2300 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंप होण्यापूर्वी 1 मार्च रोजी अभिज्ञ याने त्याच्या युट्यूब चॅनलवर जे भाकीत केले होते. त्यात या देशांमध्ये भूकंपाची शक्यता वर्तवली होती. यापूर्वी त्याने 2020 मध्ये कोविड, 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध, 2023 मधील हमासचा दहशतवादी हल्ला, 2024 मध्ये बांगलादेशातील सत्ता पालटाविषयी अगोदरच भाकीत केले होते. तर आता त्याच्या पुढील भाकीताविषयी पण चर्चा आहे. अनेक जण त्याच्या चॅनलला भेट देत आहेत.