
सिनेमा हॉलमध्ये चित्रपटाच्या तिकिटासह पॉपकॉर्न खरेदी करणे हे सर्वसामान्यांना न परवडणारे असते. पण जर एखादे थिएटर ‘अनलिमिटेड पॉपकॉर्न’ देत असेल तर? वाचूनही तुम्हाला आनंद झाला ना. पण एका थिएटरमध्ये असे खरच घडले आहे. सोशल मीडियावर या थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अनलिमेटड पॉपकॉर्नची ऑफर पाहिल्यानंतर प्रेक्षक चक्क ड्रम घेऊन पोहोचला आहे. जेणेकरून जास्तीत जास्त पॉपकॉर्न भरता येतील. सोशल मीडियावर हा मजेशीर व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ सौदी अरेबिया येथील व्हॉक्स थिएटरमधील आहे. या चित्रपटगृहाने फक्त ३० रियाल म्हणजे भारतीय चलानुसार ७०० रुपयांमध्ये अमर्यादित पॉपकॉर्न देण्याची ऑफर दिली होती. पण त्याचा परिणाम काय होणार याची व्यवस्थापनाला कल्पना देखील नव्हती. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लोक पॉपकॉर्नचा स्टॉक घेण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. काही जण इतके हुशार होते की, ते मोठे ड्रम घेऊन आले होते. तरीही थिएटर स्टाफने प्रेक्षकांना नाराज केले नाही. त्यांनी पूर्ण ड्रम भरून प्रेक्षकांना पॉपकॉर्न दिले.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला असेही दिसेल की काही लोक पॉपकॉर्न घेण्यासाठी कुकर आणि इतर भांडी घेऊन रांगेत उभे आहेत. हे व्हिडीओ @dialoguepakistan या पेजने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर शेअर केला आहे. आतापर्यंत सुमारे चार लाख लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. तसेच अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
नेटकऱ्यांनी केल्या मजेशीर कमेंट
एका यूजरने या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर कमेंट करत, ‘ही पहिली आणि शेवटची ऑफर असेल’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने, ‘सौदीची ही अवस्था असेल तर भारतात काय होईल’ असा प्रश्न विचारला आहे. तिसऱ्या एका यूजरने, ‘मला हसू अनावर होत आहे’ असे म्हटले आहे.
३५ वर्षे होते थिएटर बंद
धार्मिक आणि सांस्कृतिक मान्यतांमुळे सौदीमध्ये अनेक वर्षांपासून चित्रपटगृहांवर बंदी घालण्यात आली होती. २०१८मध्ये ३५ वर्षे जुनी बंदी उठवण्यात आली, ज्यामुळे लोकांना चित्रपटगृहांमध्ये जाऊन मनोरंजनासाठी चित्रपट पाहण्याची परवानगी मिळाली.