कैसे हो मोदीजी? मेरेकू आपको एक बात बोलनी है… ‘त्या’ चिमुकलीचा व्हिडीओ तुफ्फान व्हायरल

जम्मू-काश्मीरमधील एका चिमुरडीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. शाळेच्या दुरावस्थेची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करतानाचा या मुलीचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओतून ती मोदींना आमच्यासाठी चांगली शाळा बांधून द्या, अशी मागणी करताना दिसत आहे.

कैसे हो मोदीजी? मेरेकू आपको एक बात बोलनी है...  ‘त्या’ चिमुकलीचा व्हिडीओ तुफ्फान व्हायरल
school
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 14, 2023 | 4:25 PM

श्रीनगर : सोशल मीडियावर एका चिमुकलीचा एक व्हिडीओ तुफ्फान व्हायरल होत आहे. या व्हिडीओतून ही मुलगी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साद घालताना दिसत आहे. तुम्ही सर्वांचंच ऐकता. आज माझंही ऐका मोदीजी, असं म्हणताना ही चिमुकली दिसत आहे. एवढेच नव्हे तर कसे आहात तुम्ही? मला तुमच्याशी आज बोलायचं आहे, असंही ही मुलगी म्हणताना दिसत आहे. जम्मूतील कठुआ जिल्ह्यातील लोहाई मल्हार गावातील रहिवासी असल्याचं या मुलीचं म्हणणं आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफ्फान व्हायरल होत असून त्याला प्रचंड लाइक्सही मिळताना दिसत आहेत.

सीरत नाज असं या चिमुकलीचं नाव आहे. ती लोहाई येथील एका सरकारी शाळेत शिकते. शाळेत घाणेरड्या लादीवर बसावं लागत असल्याचं ती सांगते. पंतप्रधान मोदी यांनी आमच्या शाळेवर लक्ष दिलं पाहिजे. आमच्यासाठी चांगली शाळा बांधून दिली पाहिजे असं ती म्हणते. या व्हिडीओत ती मोदींना आपल्या शाळेचा संपूर्ण परिसर दाखवत आहे. मोदींकडे शाळेच्या दुरावस्थेबाबत तक्रार करताना दिसत आहे. या शाळेची सुधारणा होण्याची गरज असल्याचंही ते म्हणते.

शिक्षक लादीवर बसतात

संपूर्ण शाळा दाखवतानाच सीरत मुख्याध्यापकाचं कार्यालय आणि कर्मचारी रूमही दाखवते. मुख्याध्यापकाच्या समोरच्या अंगणातच वर्ग भरतो. आम्हाला घाणेरड्या लादीवर बसावं लागतं. शिक्षकही घाणेरड्या लादीवर बसतात. शाळेची इमारत आहे. पण इमारतीची अवस्था अत्यंत वाईट आहे. पाच वर्षात ही इमारत अधिक घाणेरडी झाली आहे, असं सीरत सांगते. ही इमारतही ही मुलगी दाखवते. त्यानंतर ती पुन्हा आमच्यासाठी चांगली शाळा बांधून द्या, अशी विनवणी मोदींना करते.

शौचालयही तुटलेलं

सीरत या व्हिडीओतून शाळेचा कोपरा न् कोपरा दाखवते. शाळेचं शौचालय किती घाणेरडं आहे हे सुद्धा दाखवते. शाळेचं शौचालय घाणेरडं असल्याने आम्हाला उघड्यावरच बसावं लागतं असं ती म्हणते. एका नालीकडे ती व्हिडीओ घेऊन जाते अन् सांगते इथेच आम्ही शौचाला बसतो. या व्हिडीओवर लोकांच्या भरपूर प्रतिक्रिया येत आहेत.