Rahul Gandhi : तुम्ही लग्न कधी करणार ? राहुल गांधींना छोट्या यूट्यूबरचा मजेशीर प्रश्न, दिलखुलास उत्तराने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू

हा छोटा यूट्यूबर अर्श नवाज आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी त्याच्याशी "मत चोरी" आणि त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेबद्दलही बोलले. त्याने एक प्रश्न विचारल्यावर मात्र सर्वांनाच हूस फुटलं

Rahul Gandhi : तुम्ही लग्न कधी करणार ? राहुल गांधींना छोट्या यूट्यूबरचा मजेशीर प्रश्न, दिलखुलास उत्तराने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू
राहुल गांधी लग्न कधी करणार ? छोट्या मुलाच्या सवालाने सर्वच दंग
Image Credit source: social media
| Updated on: Nov 07, 2025 | 8:46 AM

बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Election) रणधुमाळी सुरू असून काल ( गुरूवार 6 नोव्हेंबर) पहिल्या टप्प्यातील मदतान पार पडलं. राज्यातील 18 जिल्ह्यांमधील एकूण 121 मतदारसंघांमध्ये मतदानाचा हक्क बजावला गेला आणि आत्तापर्यंतच विक्रमी मतदानही झाले. बिहारमध्ये एनडीए (NDA) विरुद्ध महागठबंधन अशी थेट लढत आहे. राज्यात निवडणुकीचा महासंग्राम असल्याने वातावरण तापलेलं असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि एका छोट्या मुलादरम्यान झालेल्या हलक्याफुलक्या संवादामुळे वातावरण थोडं निवळलं आणि तणावात असलेल्या सर्वांच्याच चेहऱ्यावर हसूही फुललं.

अररिया येथे गुरुवारी जनसंपर्क मोहिमेदरम्यान राहुल गांधींचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यातील त्यांचा संवाद आणि दिलखुलासपणे दिलेली उत्तर चर्चेचा विषय ठरली आहेत.

तुम्ही लग्न कधी करणार ?

या व्हिडीओमध्ये दिसतं की एक छोटा मुलगा हसत हसत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नजीक आला. त्याला पाहून राहुल गांधीही थांबले, त्याचा हात पकडला आणि प्रेमाने त्याच्याशी बोलू लागले. त्या लहान मुलाचं नावं अर्श नवाज असून तो स्थानिक यू-ट्यूबर असल्याची माहिती समोर आली आहे. गप्पा मारता मारता त्याने राहुल गांधी यांना असा एक सवाल विचारला ज्याने सर्वांनाच हसू फुटलं. तुम्ही लग्न कधी करणार ? असा प्रश्न त्याने विचारला. ते ऐकून राहुल गांधीही हसू लागले. नंतर ते म्हणाले, ” जेव्हा माझं काम पूर्ण होईल, तेव्हा लग्न करेन” असं उत्तर त्यांनी दिलं. त्यानंतर त्यांनी मजेच तोच प्रश्न त्या मुलालाही विचारला.

राहुल गांधी आणि छोट्या यू-ट्यूबरमध्ये झालेला हा हलका-फुलका संवाद सध्या प्रचाराच्या रणधुमाळीतही चर्चेचा विषय ठरला असून त्यामुळे अनेकांना हसू आवरलं नाही.  मिळालेल्या माहितीनुसार हा संवाद 6 नोव्हेंबरचा असल्याचे समजते. तेव्हा राहुल गांधी हे अररियामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी काँग्रेस उमेदवारांसाठी प्रचार करत होते.

 

सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, अनेक युजर्सनी तो व्हिडीओ पुन्हा शेअर करत राहुल गांधींची हलकी फुलकी बाजू दिसल्याची कमेंट केली आहे. या संभाषणादरम्यान राहुल यांनी अर्श नवाज याच्याशी बोलताना ‘मत चोरी’ मुद्द्यावरील त्यांच्या पत्रकार परिषदेबद्दलही सांगितले असे समजते.