‘यात्रीगण कृपया ध्यान दे …’ रेल्वे स्थानकांवरील हा ओळखीचा आवाज कोणाचा ? रेल्वेने दिले उत्तर

रेल्वे स्थानकांवरील उद्घोषणांमध्ये नेहमी ऐकू येणारा आवाज सरला चौधरी यांचा आहे. रेल्वेशी त्यांचे नाते जुळण्याची कहाणी अत्यंत वेगळी आहे. पाहूया सरला चौधरी कोण आहेत...ते

यात्रीगण कृपया ध्यान दे ... रेल्वे स्थानकांवरील हा ओळखीचा आवाज कोणाचा ? रेल्वेने दिले उत्तर
Smt. Sarala Chaudhary
Image Credit source: socialmedia
| Updated on: Mar 31, 2023 | 4:14 PM

नवी दिल्ली : ‘यात्रीगण कृपया ध्यान दे….’ रेल्वे स्थानकांच्यावर नेहमीच ऐकायला मिळणारा हा आवाज आपल्या चांगलाच ओळखीचा झाला आहे. जर कोणी त्याच्या जीवनात एकदा तरी रेल्वे प्रवास केला असेल तर त्याने हा आवाज ऐकलेलाच असतो. हा आवाज कोणाचा आहे असा प्रश्न अनेकवेळा आपल्याला पडतो. रेल्वेच्या प्रत्येक स्थानकांवर सेंट्रल अनाऊन्स सिस्टीमद्वारे हा आवाज आपल्याला ऐकू येत असतो. इतकी वर्षे हा आवाज निवृत्त कसा झाला नाही. या आवाजामागील व्यक्ती कोण आहे या साऱ्यांची उत्तरे रेल्वेने दिली आहेत.

रेल्वे स्थानकांवर आपल्याला ‘यात्रीगण कृपया ध्यान दे’ या आवाजाची ओळख इतकी झालेली आहे की हा आवाज कोणाचा असावा असा आपल्याला कायम प्रश्न पडत असतो. या गोड आणि खणखणीत आवाजामागे कोणती व्यक्ती आहे याची उत्सुकता भारतीय रेल्वेने दूर केली आहे. साल 1982 मध्ये सरला चौधरी यांच्या सह हजारो उमेदवारांनी मध्य रेल्वेच्या उद्घोषक पदासाठी अर्ज दिला होता. त्यात अर्था सरला चौधरी यांच्या आवाजाला सर्वांनी पसंती मिळत त्यांची उद्घोषक पदासाठी निवड झाली, अर्थात त्यांची ही नोकरी अस्थायी स्वरुपाची होती. परंतू जेव्हा सरला यांचा आवाज प्रवाशांचे ध्यान केंद्रीत करीत आहे, आणि त्यांना तो खरोखरच आवडला आहे असे जेव्हा रेल्वेला समजले तेव्हा सरला चौधरी यांना 1986 मध्ये नोकरीत कायम करण्यात आले.

 

 

आजही होतो आवाजाचा वापर 

साल 2015 नंतर रेल्वेच्या उद्घोषणांचे संगणकीकरण करण्यात आले, त्यानंतरही देखील सरला यांचा आवाज रेकॉर्ड करून आजही देशभरातील रेल्वे स्थानकांवर उद्घोषणा करण्यासाठी वापरला जात आहे. नव्या ट्रेनच्या समावेशामुळे त्यांची नावे वेगळ्या आवाजात ऐकायला जरी येत असली तरी सरला यांचा रेकॉर्ड केलेला आवाज सुरूवातीला आणि मधे मधे ऐकायला मिळतो. आज सरला चौधरी रेल्वे मध्ये उद्घोषक पदावर जरी नसल्या तरी त्यांचा आवाज मात्र आजही रेकॉर्डींगच्या स्वरूपात काम करीत आहे. सरला चौधरी यांना सुरूवातीला रेल्वे स्थानकांवर अनाऊन्समेंट करण्यासाठी खूप मेहनत घ्यायला लागत होती. वेगवेगळ्या स्थानकांत त्यांना जावे लागे. वेगवेगळ्या भाषेत त्यांचे आवाज रेकॉर्ड केले जात असत. आता रेल्वे उद्घोषणांची जबाबदारी ट्रेन मॅनेजमेंट सिस्टीम सोपवण्यात आली आहे.