‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक; चांगल्या परताव्यासोबतच मिळेल आर्थिक संकटात आधार

तुम्हाला जर अचानक पैशांची गरज लागली तर वैयक्तीक कर्ज घेण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. मात्र अशा देखील अनेक योजना आहेत, ज्यांच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला संकटाच्या काळात कर्ज उपलब्ध होते.

'या' योजनांमध्ये करा गुंतवणूक; चांगल्या परताव्यासोबतच मिळेल आर्थिक संकटात आधार
अजय देशपांडे

|

Jun 19, 2022 | 10:58 AM

मुंबई : अमृतला आपल्या बहिणीच्या उपचाराचा खर्च भागवण्यासाठी 18 टक्के व्याजाने पर्सनल लोन (Personal loan) घ्यावं लागलंय. अद्याप तो कर्जाचे हप्ते भरतोय. अचानक पैशांची गरज भासली तर महागड्या वैयक्तिक कर्जाशिवाय तुमच्याकडे फारसे पर्याय नसतात. परंतु अशी अनेक गुंतवणुकीची (Investment) साधने आहेत, त्यांचा वापर करून तुम्ही पैशांची गरज भागवू शकता. गुंतवणूक करताना आपण गुंतवणूक साधनाचा कालावधी, परतावा आणि लॉक-इन-पीरियड पाहतो. दीर्घकालीन गुंतवणुकीच्या बाबतीत लॉक-इन नियम लागू होतात. तुम्ही मुदत संपण्यापूर्वी पैसे (Money) काढू शकत नाही, अन्यथा, तुम्हाला मोठा दंड भरावा लागतो. परंतु, काही गुंतवणूक साधने तुम्हाला अशत: पैसे काढण्याची परवानगी देतात ,अशावेळी तुम्हाला कर्जासाठी अर्ज करावा लागतो. प्रत्येक गुंतवणूक साधनांमध्ये कर्ज देण्याचे निकष देखील वेगळे आहेत. आज आपण अशाच काही पर्यायांबद्दल जाणून घेणार आहोत.

पोस्टाची पीपीएफ योजना

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. पीपीएफ खाते बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर आणि मॅच्युरिटी रकमेवर देखील कर सवलत मिळविण्यासाठी पात्र आहात. पीपीएफ गुंतवणूक 15 वर्षांसाठी करावी लागते. परंतु, 15 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वी, ग्राहक त्याच्या पीपीएफ खात्यावर कर्जासाठी देखील अर्ज करू शकतो. तुम्ही तुमचे पीपीएफ खाते उघडल्यानंतर तिसऱ्या आणि सहाव्या वर्षी कर्जाचा लाभ घेऊ शकता. तुम्ही कर्जासाठी अर्ज केल्यास चालू वर्षाच्या मागील वर्षापर्यंत तुम्ही जेवढी रक्कम भरली आहे, त्याच्या 25 टक्क्यांपर्यंत कर्ज तुम्हाला तात्काळ मंजुर होते. याचा अर्थ, तुम्ही 2019-20 मध्ये कर्जासाठी अर्ज केला असेल, तर तुम्ही 31 मार्च 2018 पर्यंत तुमच्या जमा गुंतवणुकीच्या 25 टक्के कर्जासाठी पात्र असाल. या कर्जाची परतफेड 36 महिन्यांत म्हणजेच तीन वर्षांमध्ये करावी लागते. याचा व्याज दर हा पीपीएफवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा एक टक्का जास्त असतो.

आवर्ती ठेव योजना

पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव खात्यावर कर्जासाठी अर्ज करता येतो. आरडीचा कालावधी पाच वर्षांचा असतो. आवर्ती ठेवीमध्ये पैसे हप्त्यांमध्ये जमा करण्यात येतात. 12 हप्ते जमा केल्यानंतर गुंतवणूकदार ठेव रकमेच्या 50 टक्क्यांपर्यंत कर्जासाठी अर्ज करू शकतो. RD कर्जावरील व्याजदर हा ठेवींवर मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा दोन टक्क्यांनी जास्त असतो. उदाहरणार्थ, पोस्ट ऑफिस ठेवीवर 5.8 टक्के दरानं व्याज मिळत असल्यास, कर्ज 7.8 टक्के व्याजानं मिळतं. कर्जाची परतफेड एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये करता येते. मुदतपूर्ण होईपर्यंत कर्जाची परतफेड न केल्यास आरडी खात्यातून कर्जाची रक्कम आणि व्याज वजा करण्यात येते.

हे सुद्धा वाचा

मुदत ठेव योजना

काहीही तारण न ठेवता बँकेच्या मुदत ठेवीवर देखील कर्ज मिळते. या कर्जावरील व्याज दर हा एफडीपेक्षा एक किंवा दोन टक्के जास्त असतो. कर्जाची परतफेड 60 महिन्यांत करता येते. ही कर्ज ओव्हरड्ऱॉफ्ट किंवा डिमांड लोनच्या नावानं दिली जातात. बँक खात्यात जमा झालेल्या रकमेच्या 85 टक्क्यांपर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकते. मात्र 5 वर्षांच्या करबचत एफडीवर कर्ज मिळत नाही.आयुष्यात कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. अशावेळी कोणतेही तारण न ठेवता पर्सनल लोन मिळते मात्र पर्सनल लोनमध्ये व्याज दर जास्त असतो. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एफडी, पीपीएफ किंवा आरडीसारख्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला ऐनवेळी स्वस्तदरात कर्ज उपलब्ध होऊ शकते.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें