Petrol Diesel Price: ‘अब की बार 120 पार’; सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

| Updated on: Oct 22, 2021 | 7:43 AM

Petrol price | पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 112.78 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 103.63 रुपये मोजावे लागत आहेत.

Petrol Diesel Price:  अब की बार 120 पार; सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ
पेट्रोल
Follow us on

मुंबई: देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करत आहेत. यामध्ये आता आणखी भर पडली आहे कारण शुक्रवारी भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलीटर दरात प्रत्येकी 35 पैशांची वाढ झाली आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.

पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 112.78 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 103.63 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 106.89 आणि 95.62 रुपये इतका आहे. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच 120 रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कच्च्या तेलाचे दर सात वर्षांतील उच्चांकी पातळीवर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या NYME क्रूडचा दर 80 डॉलर्स प्रतिबॅरलच्या आसपास आहे. हा गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर आहे. कोरोनामुळे खनिज तेलाचे कमी झालेले उत्पादन तातडीने वाढवणे शक्य नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रेंट क्रूड 90 डॉलर्स प्रतिबॅरलची पातळी गाठेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

पुण्यातील सार्वजनिक बस वाहतूक सेवेला इंधन दरवाढीचा फटका

कोरोना संकटामुळे अगोदरच रडतखडत सुरु असलेल्या पुण्यातील PMPML बस सेवेला आता इंधन दरवाढीचा मोठा फटका बसताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वेगाने वाढ झाली आहे. डिझेलची किंमत वाढल्याने PMPML ची संचलन तूट तब्बल 600 ते 700 कोटी इतका होण्याचा अंदाज असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. गेल्यावर्षी ही तूट 497 कोटी होती. मात्र, यंदा पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी या तिन्ही इंधनांच्या दरात वाढ झाल्याने वित्तीय तुटीचा आकडा वाढला आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किंमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

संबंधित बातम्या:

Petrol Diesel price: मोदी सरकार नागरिकांना दिवाळी गिफ्ट देणार, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट होणार?

कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?

दसरा-दिवाळीपर्यंत ‘ही’ गोष्टही महागण्याची शक्यता; पेट्रोल, डिझेलनंतर ‘कॉमन मॅन’ला आणखी एक झटका

खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?