
पगार जमा झाल्याचा मेसेज येतो न येतो तोच, ‘कुठे गेला माझा पैसा?’ असा प्रश्न तुम्हालाही पडतो का? मित्रांनो, ही फक्त तुमची नाही, तर अनेकांची व्यथा आहे. पैशांची बचत करणं हे आता फारच गरजेचे झाले आहे. पण घाबरू नका! बचत करणं म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही. काही सोप्या आणि स्मार्ट बदल करुन तुम्हीही तुमचा खिसा कायम भरलेला ठेवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा काही खास टीप्स देणार आहोत, ज्यामुळे तुमचा खिसा कायम भरलेला राहील.
आजही विजेचं बिल पाहून तुमचे डोळे पांढरे होतात का? तर आता स्मार्ट होण्याची वेळ आली आहे. तुम्ही तुमच्या घरातील साधे बल्ब काढून एनर्जी सेविंग करणारे बल्ब लावा. हे बल्ब दिसायला लहान असेल तरी वीज बिलात मोठी बचत करतात. तसेच खिडक्यांना ब्लॅकआउट पडदे लावा, ज्यामुळे उन्हाळ्यात घर थंड राहील आणि तुमचा एसीचा वापर कमी होईल.
पाण्याचा वापर जपून करा. नळांमधून पाणी गळत असल्यास लगेच दुरुस्त करून घ्या. यामुळे तुमचे वीजेचे आणि पाण्याचे बील कमी होईल. बिलाचा आकडा कमी झाल की आपोआपच तुमचे पैसे वाचतील.
दर महिन्याला आपण मोबाईलचे रिचार्ज करतो. पण कित्येक वेळा डेटा पॅकचा वापर होत नाही. अशावेळी कमी डेटा असलेला प्लॅनची निवड करा. तसेच अनेक कंपन्या फॅमिली किंवा ग्रुप प्लॅन देतात, जे खूप स्वस्त पडतात. तसेच जर तुम्हाला वारंवार फोन बदलत असाल तर ती सवय बदला. कारण तुमचा जुना फोन खूप वर्ष टिकू शकतो. वारंवार फोन बदलण्याच्या सवयीमुळे तुम्ही मोठा खर्च वाचवू शकता.
प्रत्येक वीकेंडला मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये पार्टी, पिझ्झा ऑर्डर करणं किंवा फूड डिलिव्हरी ॲप्सचा वापर करणे टाळा. यामुळे तुमचा खिसा सर्वाधिक रिकामी होतो. बाहेरचं खाणं फक्त महागच नाही, तर आरोग्यासाठीही धोकादायक आहे. त्यापेक्षा त्या गोष्टी घरी आणून घरीच जेवण बनवायला सुरुवात करा. यामुळे तुमच्या पैशांची बचतही होईल आणि सोबत तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधीही मिळेल. आठवड्यातून एकदा घरी काहीतरी स्पेशल बनवा. यामुळे तुम्हालाही चमचमीत खाल्ल्याचा आनंद घेता येईल.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. जर तुम्ही रोज तुमच्या गाडीने प्रवास करत असाल, तर नक्कीच तुमचा खिसा रिकामा होईल. त्यापेक्षा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. बस, मेट्रो किंवा शेअरिंग कॅबचा वापर करा. यामुळे तुमचे पैसेही वाचतील आणि तुमची वाहतुकीच्या कोंडीतूनही सुटका होईल.
तुम्ही किती OTT प्लॅटफॉर्म्स, जिम मेंबरशिप किंवा मॅगझिन सबस्क्रिप्शन घेतले आहेत, त्याचा नक्की वापर करता का? याचा कधी विचार केला आहात का? आपल्यातील अनेक लोक सबस्क्रिप्शन्स घेतात, पण त्याचा कधी वापर करत नाही. आता या निरुपयोगी खर्चांना ‘टाटा- बाय’ करण्याची वेळ आली आहे. तुम्ही जे सबस्क्रिप्शन वापरत नाही, ते लगेच रद्द करा. दर महिन्याला नक्कीच तुमचे पैसे वाचतील.