
लग्नानंतर अनेक महिलांसमोर एक प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे आडनाव बदलायचं की नाही? भारतात आडनाव बदलणं बंधनकारक नाही, परंतु जर तुम्ही पतीचं आडनाव स्वीकारण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या नावात काही बदल करायचं असेल, तर त्यासाठी एक कायदेशीर प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया थोडी किचकट वाटू शकते, पण योग्य मार्गदर्शन आणि कागदपत्रांसोबत तुम्ही हे सहज करू शकता. चला तर मग, जाणून घेऊया स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया.
स्टेप 1: शपथपत्र तयार करणे
आडनाव बदलण्याच्या प्रक्रियेतील पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे शपथपत्र (Affidavit) तयार करणे. हे शपथपत्र स्टॅम्प पेपरवर कायदेशीर भाषेत तयार करावं लागेल. यासाठी तुम्ही वकिल किंवा नोटरी पब्लिकच्या मदतीचा वापर करू शकता. शपथपत्रात तुमचं जुनं आणि नवीन नाव, पतीचं नाव, तुमचा पत्ता आणि लग्नाची तारीख आणि ठिकाण असं सर्व माहिती सुस्पष्टपणे असावी लागते. यासोबत तुमचा विवाह प्रमाणपत्र (Marriage Certificate) देखील जोडावा लागतो. तयार झालेलं शपथपत्र नोटरी अधिकाऱ्यांकडून साक्षांकित करणे आवश्यक आहे.
स्टेप 2: वर्तमानपत्रात जाहिरात देणे
तुम्ही नाव बदलले आहे, याची सार्वजनिक घोषणा करणं कायद्यानुसार आवश्यक आहे. यासाठी तुमच्या भागातील किमान दोन स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये नाव बदलाची जाहिरात द्यावी लागते. जाहिरातीमध्ये तुमचं जुनं नाव, नवीन नाव आणि पत्ता नमूद करावा लागतो. या जाहिरातीच्या कात्रणं किंवा प्रत तुमच्याकडे जपून ठेवणं महत्त्वाचं आहे, कारण ते पुढील प्रक्रिया करताना आवश्यक ठरू शकतात.
स्टेप 3: सरकारी राजपत्रात अधिसूचना
ही पायरी कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य नसली तरी, सरकारी राजपत्रात नाव बदलाची अधिसूचना प्रकाशित करणं एक अधिकृत प्रक्रिया आहे. या अधिसूचनेला बँक, पासपोर्ट ऑफिस आणि इतर सरकारी कार्यालयांमध्ये अधिकृत पुरावा म्हणून मानलं जातं. यासाठी तुम्हाला एक अर्ज करून शुल्क भरून सरकारच्या प्रकाशन विभागात नाव बदलाची अधिसूचना प्रकाशित करण्यासाठी अर्ज करावा लागतो.
स्टेप 4: कागदपत्रांमध्ये नाव बदलणे
तुम्ही वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, आता तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये नवीन नाव आणि आडनाव अपडेट करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला संबंधित कार्यालयांमध्ये अर्ज करून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. या कागदपत्रांमध्ये तुम्हाला बदल करावा लागतो :
1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड
3. बँक खातं
4. मतदार ओळखपत्र
5. पासपोर्ट
6. ड्रायव्हिंग लायसन्स