Anjali Damania News : प्रकरण तिथल्या तिथे निपटवण्याचा मुंडेंचा प्रयत्न होता, दमानियांचा गंभीर आरोप
Anjali Damania Serious Allegations On Dhananjay Munde : बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यासह आणखी 10 आरोपींना सहआरोपी करण्याची मागणी आज अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. यावेळी त्यांनी मुंडे यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत.
बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या सातत्याने धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेताना दिसल्या आहेत. त्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता पुन्हा एकदा दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणी करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
यावेळी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, संतोष देशमुख अपहरण, खंडणी, हत्या हे सर्व धनंजय मुंडे यांना माहीत होतं. त्यांच्या बंगल्यावरच खंडणीची बैठक झाली होती. या बैठकीत 2 पोलीस कर्मचारी देखील सहभागी होते. मात्र आरोपपत्रात त्यांचं नाव नाही. धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून तीन माणसं काम करत होती, असा गंभीर आरोप दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे. मुंडेंवर आरोप करताना शिवलिंग मोराळे, बालाजी तांदळे, सारंग आंदळे यांच्या नावाचा उल्लेख दमानिया यांनी केला आहे. बालाजी तांदळे याला सांगण्यात आलं होतं की, 9 तारखेपासून तांदळे हा पोलिसांबरोबर फिरत होता. हे प्रकरण शेकायला लागलं, तेव्हा तो आरोप कराड किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचू नये, यासाठी या लोकांना अटक करुन तिथल्या तिथे निपटवा. यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत होते, असा गंभीर आरोपच दमानिया यांनी यावेळी केला आहे.