Sambhajinagar News : कबरीच्या वादामुळे बीबी का मकबरा परिसरातही पसरला शुकशुकाट
Bibi Ka Maqbara Tourist Place : औरंगजेबाची कबर काढण्याच्या वादामुळे संभाजीनगर शहराच्या इतर पर्यटन स्थळांमध्ये देखील भीतीमुळे शुकशुकाट बघायला मिळत आहे. त्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने बीबी का मकबरा सारखे गर्दीने गजबजलेले परिसर सुनसान झालेले दिसत आहेत.
राज्यात औरंगजेबाची कबर काढून टाकण्याचा वाद चिघळला आहे. या मागणीला हिंसक वळण लागायला लागलं आहे. ही कबर छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यात असल्याने जिल्ह्यात आता याचे पडसाद उमटायला लागले आहेत. संभाजीनगर शहरात असलेल्या बीबी का मकबरा परिसरात या वादामुळे पर्यटकांची संख्या घटली आहे. कबर काढण्याच्या वादाला कधीही हिंसक वळण येण्याची भीती असल्याने पर्यटकांसह संभाजीनगरच्या नागरिकांनी देखील बीबी का मकबरा परिसरकडे पाठ फिरवली आहे. त्यातच उन्हाळा सुरू झाला असल्याने देखील याठिकाणी शुकशुकाट बघायला मिळत आहे. त्यामुळे इतर वेळी परिसरातल्या आणि पर्यटनांच्या गर्दीने भरून जाणारा हा परिसर सध्या तणावपूर्ण शांततेत असल्याचं दिसत आहे. याचा फटका याठिकाणी असलेल्या स्थानिक व्यापाऱ्यांना देखील बसत आहे.