Beed : 19 बाईक्स, 40 ते 50 जणं.. रात्रीच्या अंधारात हातात चाकू अन्… एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला, CCTV समोर
बीडच्या शाहूनगर भागातील गजानन कॉलनीत आडागळे कुटुंबावर हल्ला केलेल्या हल्लेखोरांचा वावर CCTV कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. तब्बल 19 दुचाकी गाड्यांवर 45 ते 50 हल्लेखोर आले आणि त्यांनी आडागळे कुटुंबावर हल्ला केला.
अशोक काळकुटे, बीड
दोन दिवसांपूर्वी बीड शहरातील शाहूनगर भागात असलेल्या गजानन कॉलनीत राहणाऱ्या आडागळे कुटुंबावर रात्री 12 ते 12:30 च्या दरम्यान हल्ला केला होता. तरुणांमध्ये बाहेर झालेल्या किरकोळ वादानंतर काही टोळक्याने तुमचा मुलगा कुठे लपला आहे? असा जाब विचारत कुटुंबावर हल्ला केला होता. दगडाने मारहाण करत चाकूचा धाक दाखवल्याचा आरोप आडागळे कुटुंबाने केला होता. यामध्ये दिनकर आडागळे आणि रेणुका आडागळे हे जखमी झाले होते त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी या संदर्भात माहिती देताना 30 ते 40 जणांनी हा हल्ला केल्याची माहिती दिली होती. मात्र या हल्लेखोरांचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेले व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये तब्बल 19 मोटारसायकल आणि या मोटारसायकलींवर असलेले जवळपास 45 ते 50 जण दिसून येत आहेत. याच टोळक्याने आडागळे कुटुंबावर हल्ला करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.