‘पक्षांतर्गत गोष्टींची उणीधुणी बाहेर काढायची नाही’, अशोक चव्हाण यांच्या हाती कमळ?
अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्यात. अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या आमदारांचा भलामोठा गट भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या चर्चादरम्यान, अशोक चव्हाण यांनी माध्यमांसमोरच प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, १२ फेब्रुवारी २०२४ : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा यासह आमदारकीचादेखील त्यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर काँग्रेससह राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यानंतर अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्यात. अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या आमदारांचा भलामोठा गट भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या चर्चादरम्यान, अशोक चव्हाण यांनी माध्यमांसमोरच प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे, असं काही नाही. मी अनेक वर्षांपासून, जन्मापासून ते आतापर्यंत काँग्रेसचं काम केलं आहे. मला वाटतं की, आता अन्य पर्याय पाहिले पाहिजेत. त्यामुळे मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे, असे त्यांनी म्हटले तर ‘मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रमाणिकपणे काम केलं आहे. यापुढची राजकीय दिशा, मी एक-दोन दिवसात निर्णय घेईन. मी अद्याप ठरवलेलं नाही. दोन दिवसात मी माझी राजकीय भूमिका काय असेल ते ठरवेल. भाजपची कार्यप्रणाली मला अद्याप माहिती नाही. मी भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही’, असेही त्यांनी म्हटले.