Anil Deshmukh यांच्या मूळ गावातील घरांवर ED चा छापा

नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे अनिल देशमुख यांचे वडिलोपार्जित घर आहे. या घरांमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांची सर्च मोहीम सुरु आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नागपूरमधील काटोल आणि वडविहिरा येथील देशमुखांच्या निवासस्थानी ईडीने छापे टाकले आहेत. रविवारी सकाळपासूनच अंमलबजावणी संचलनालयाने छापेमारी सुरु केली आहे. आधीच देशमुखांच्या साडेतीनशे कोटींच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली असताना आता देशमुखांचा पाय आणखी खोलात जाण्याची चिन्हं आहेत.

नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे अनिल देशमुख यांचे वडिलोपार्जित घर आहे. या घरांमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांची सर्च मोहीम सुरु आहे.

साडेतीनशे कोटींची मालमत्ता जप्त

दरम्यान, अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती 16 जुलै रोजी समोर आली होती. मात्र ईडीने जप्त केलेल्या या मालमत्तांची सध्याची किंमत ही 350 कोटी रुपये इतकी असल्याची नवी माहिती नंतर समोर आली. ईडीने वरळी येथील एक फ्लॅट (खरेदी किंमत 1 कोटी 54 लाख रुपये) तसेच रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील धुमत गावातील 8 एकर 30 गुंठे जमीन जप्त केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी या मालमत्तेची किंमत 4 कोटी 20 लाख असल्याचं आधी म्हटलं होतं. परंतु ही खरेदी किंमत असून या मालमत्तेची आजच्या बाजारभावानुसार किंमत तब्बल 350 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

देशमुख पितापुत्र चौकशीसाठी गैरहजर

अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने मनी लाँन्ड्रिगचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात ईडीने अनिल देशमुख यांना तीनदा चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. तर त्यांचा मुलगा ऋषिकेश याला एकदा समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र, दोघेजण चौकशीसाठी हजर न राहता चौकशी टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेले आहेत. त्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनाही समन्स बजावलं होतं. त्यांनीही हजर न राहता आवश्यक ती कागदपत्रे ईडीला सादर केली आहेत.

…म्हणून देशमुखांची मालमत्ता जप्त

मुंबईतील काही बार मालकांनी आपण निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला पैसे दिल्याचं म्हटलं होतं. ही रक्कम 4 कोटी 70 लाख रुपये आहे. हीच रक्कम अनिल देशमुख यांना मिळाली असावी आणि रक्कम त्यांनी अशा पद्धतीने लाँड्रिंग केली असावी, असा ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. त्यामुळेच ईडीच्या आधिकाऱ्यांनी 4 कोटी 70 लाख रुपयांच्या बदल्यात खरेदी किंमत असलेली 4 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मात्र  जप्त केलेल्या या मालमत्तेची प्रत्यक्षात बाजार भावाने किंमत 350 कोटी रुपये आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात कथित 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले आहेत. याच प्रकरणाचा तपास सध्या ईडीकडून सुरु आहे.

संबंधित बातमी :

माजी गृहमंत्री अनिल देशुमखांवर ईडीची मोठी कारवाई, देशमुखांच्या कोण-कोणत्या संपत्तीवर टाच?

4 कोटी नव्हे तर तब्बल 350 कोटींची मालमत्ता जप्त, ईडीचा अनिल देशमुखांना मोठा दणका

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI