बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या पक्षाची काँग्रेस… कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?

बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या पक्षाची काँग्रेस… कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?

| Updated on: Sep 02, 2026 | 6:45 PM

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवसेनेत लोकशाहीचा अभाव आणि मनमानी कारभार सुरू झाल्याचे म्हटले. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, मराठा आरक्षणावर महायुतीची भूमिका आणि पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी घेतलेल्या बैठकीवर त्यांनी माहिती दिली. न्याय्य मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही शिंदेंनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेनेत लोकशाही पद्धतीने निवडणुका न झाल्यामुळे मनमानी कारभार सुरू झाला होता. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या बाजूने सुरू असलेल्या युक्तिवादावर बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांनी घालून दिलेल्या विचारधारेचे आणि पक्षाच्या घटनेचे नंतरच्या काळात उल्लंघन झाले. त्यांची विचारसरणी बाजूला सारून वेगळे निर्णय घेतले गेले, ज्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने असे मानले की बाळासाहेबांचे विचार गोठवले गेले आहेत. आपल्या गटाने बाळासाहेबांचे विचार पुढे नेल्याचा दावा त्यांनी केला. इतकेच नाही तर त्यांनी सांगितले की, बाळासाहेबांचे एक वक्तव्य सगळ्यांनाच माहित आहे. ते म्हणाले होते, ‘मी माझ्या पक्षाची काँग्रेस होऊ देणार नाही, ज्या दिवशी मला वाटेल असं होतंय, तर मी माझं दुकान बंद करेन’. ही स्पष्ट विचारधारा ठाकरेंनी बदलली. त्यांनी काँग्रेससोबत हातमिळवणी केली.

मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना, शिंदे यांनी महायुती सरकार मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला न्याय्य हक्क मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचे काम सुरू झाले आणि सध्याच्या महायुती सरकारने १० टक्के आरक्षण तसेच कुणबी प्रमाणपत्रांच्या माध्यमातून सकारात्मक पावले उचलली आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Published on: Sep 02, 2026 6:45 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us