Boycott Cabinet : एकनाथ शिंदे एकटेच कॅबिनेटला हजर… इतरांची दांडी, शिवसेनेचे सर्वच बडे मंत्री नेमके कशावर नाराज?
भाजपमधील पक्षप्रवेशांवरून शिवसेनेत नाराजी निर्माण झाल्याने शिवसेनेच्या (शिंदे गट) मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. कल्याण-डोंबिवलीतील पक्षप्रवेशांमुळे निर्माण झालेल्या असंतोषावर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांनी दोन्ही पक्षांना भविष्यात असे पक्षप्रवेश टाळण्याचा सल्ला दिला.
भाजपमध्ये होत असलेल्या पक्षप्रवेशांवरून नाराजी व्यक्त करत शिवसेनेच्या (शिंदे गट) मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घातला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील माजी नगरसेवक आणि नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे हा असंतोष निर्माण झाला आहे. आज सकाळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या नाराजीत भर पडली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे पक्षप्रवेश घडले.
ठाणे जिल्हा हा शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो, त्यातच भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत असल्याची भावना शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये आहे. कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असले तरी, इतर शिवसेनेचे मंत्री अनुपस्थित होते. या नाराजीनंतर गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, शंभूराज देसाई, संजय राठोड आणि गोगावले या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत, फडणवीसांनी मंत्र्यांना फटकारले. त्यांनी सांगितले की, उल्हासनगरमध्ये शिवसेनेनेच भाजपला पहिला धक्का दिला होता, त्यामुळे तुम्ही कराल ते चालणार, आम्ही केले ते चालणार नाही, असे होणार नाही. भविष्यात दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश टाळावेत, असा सल्ला फडणवीसांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

