Holi Special : चिकन, मटणवाल्यांचीच हाय हवा! धूळवड स्पेशल बेतासाठी मुंबईत मटणाच्या दुकानांबाहेर लागल्या रांगा
Crowd On Mutton Chicken Shops : धूळवडला मांसाहार करण्याची परंपरा अनेक भागात आहे. त्यामुळे आज मुंबईत मटण - चिकन खरेदीसाठी खवय्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या बघायला मिळाल्या आहे.
आज राज्यात सगळीकडे धूळवड साजरी केली जात आहे. बऱ्याच भागात आज रंग खेळला जातो. सर्वत्र रंगाची उधळण होत असताना रंगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. त्यातच सुट्टी असल्याने अनेकांनी आज मांसाहाराचा बेत आखला आहे. त्यामुळे मुंबईत मटणाच्या दुकानावर लांबच लांब रांगा बघायला मिळत आहे. आज सकाळपासूनच चिकन- मटण घेण्यासाठी वेगवेगळ्या भागातल्या मटण दुकानांसमोर मांसाहार प्रेमींच्या रांगा लागलेल्या असल्याने मटण खरेदीसाठी दीड ते दोन तास वाट बघवी लागत असल्याचं समोर आलं आहे. मात्र तरीही धूळवडचा उत्साह मात्र कुठेही कमी झालेला नाही.
होळीला पूरणपोळी खाल्यानंतर धूळवडला मांसाहार करण्याची परंपरा अनेक भागात आहे. त्यामुळे पुण्यासह मुंबईत देखील आज धुळवडीमुळे चिकन आणि मटणाच्या दुकानात मोठी गर्दी जमा झाली आहे. मटण प्रेमी मार्केटमध्ये चिकन आणि मटण खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने गेल्या दीड ते दोन तासांपासून रांगेत उभे आहेत.