‘पोरांनो…’त्या’ भानगडीत तुम्ही पडू नका’, इंदुरीकर महाराजांनी तरूणांना काय दिला सल्ला?
महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार निवृत्ती इंदोरीकर महाराज नेहमी आपल्या वक्तव्यानं चर्चेत असतात. इंदोरीकर महाराज हे आपल्या अनोख्या किर्तनाच्या शैलीने प्रसिद्ध आहेत. त्यांची किर्तनं हे संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असतात. अशातच त्यांनी तरूणांना एक संदेश दिलाय.
निवृत्ती इंदोरीकर महाराज हे राजकारण, समाजकारण, संसार, व्यसनमुक्त अशा अनेक मुद्द्यांवर ते आपल्या किर्तनातून भाष्य करत असतात. नुकतीच अकोला येथे किर्तनकार निवृत्ती इंदोरीकर महाराज यांची किर्तन सेवा पार पडली यामध्ये त्यांनी तरूणांना सल्ला दिल्याचे पाहायला मिळाले. धर्माच्या नावावर दंगली घडवू पाहणाऱ्या नेत्यांना इंदोरीकर महाराज यांनी फटकारत तरूण वर्गाला सल्ला देत अशा प्रवृत्तीना बळी पडू नका, असा संदेश दिला आहे. पोरांनो.. दंगलीच्या भानगडीत पडू नका, असं आवाहन निवृत्ती इंदोरीकर महाराज यांनी तरूणांना केलं आहे. दंगलीच्या वेळी कॅमेऱ्यात पकडले गेले की १० वर्षांची शिक्षा होते, असे म्हणत अकोल्यातील किर्तनात इंदुरीकर महाराजांनी तरूणांना हा संदेश दिला आहे. पुढे ते असेही म्हणाले, आतापर्यंत कोणालाही शिक्षा झाली असेल तर ती गरिबांच्या मुलांना झाली आणि ते जेलमध्ये गेलेत.. मोठ्यांच्या मुलांना कोणतीही शिक्षा होत नाही. हे मी तुम्हाला कळकळीने सांगतो, असे ते म्हणाले.