Kailas Borade Video : ‘प्रसाद म्हणून मी दारू…’, जरांगेंनी दाखवलेल्या ‘त्या’ खळबळजनक व्हिडीओवर कैलास बोराडे काय म्हणाला?
जालना जिल्ह्यातील आनवा गावातील एका मंदिरात कैलास बोराडे नावाचा व्यक्ती शिरला. यानंतर तो मंदिरात का शिरला म्हणून कैलास बोराडेला तप्त लोखंडी सळईने चटके देऊन अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली होती. या घटनेत आरोपीने अमानुष पद्धतीने मारहाण केल्याचे व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
जालन्यातील कैलास बोराडे नावाच्या व्यक्तीला गरम सळईने चटके दिल्याच्या प्रकरणाला नवं वळण आल्याचे पाहायला मिळत आहे. कैलास बोराडे या व्यक्तीचा मद्यधुंद अवस्थेतील एक व्हिडीओ मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणला. कैलास बोराडे हा मद्यधुंद आणि अर्धनग्न अवस्थेत असून तो अशा अवस्थेत मंदिरात गेल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय हाच व्हिडीओ मनोज जरांगे पाटील यांनी दाखवला होता. दरम्यान, या व्हिडीओवर कैलास बोराडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘तो व्हिडीओ माझाच आहे’, असं कैलास बोराडे यांनी म्हटलं असून मी प्रसाद म्हणून दारू प्यायलो असल्याचे कैलास बोराडे यांने सांगितलं. इतकंच नाहीतर मला अंगात आल्यासारखं झालं होतं, असंही स्पष्टीकरण कैलास बोराडे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी दाखवलेल्या व्हिडीओवर दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
जालना जिल्ह्यातील तालुक्यातील अनवा येथील कैलास बोराडेला मंदिरात प्रवेश केला म्हणून मारहाण केल्याची माहिती आणि व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपूर्वी समोर आला होता. तप्त लोखंडी सळईने अंगावर चटके देऊन अमानुष मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला अन् राज्यातून संतप्त प्रतिक्रया उमटल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी सोनू उर्फ भागवत दौड या आरोपीला अटक केले असून त्याचा भाऊ उबाठा तालुका अध्यक्ष नवनाथ दौड असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी जालन्यातील पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.