कार्तिकी एकादशीचा तिढा सुटला, उपमुख्यमंत्री करणार विठ्ठलाची शासकीय महापूजा
मराठा आंदोलकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्लाची शासकीय महापूजा होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी मराठा आंदोलकांसोबत चर्चा करून यावर मार्ग काढला आहे.
पंढरपुर | 21 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा होऊ देणार नाही असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला होता. मात्र, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मराठा आंदोलकांची बैठक घेतली. यावेळी मराठा आंदोलकांनी ज्या मागण्या केल्या त्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या. त्यामुळे यंदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते पंढरपुरामध्ये विठ्ठलाची शासकीय महापूजा होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. कार्तिक एकादशीदिवशी फडणवीस पंढरपूरात येणार आहेत. मराठा आंदोलकानी देवेंद्र फडणवीस यांना केलेला विरोध आता मावळला आहे. त्यामुळे त्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा होईल असे त्यांनी सांगितले. बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात येणार. आहेत. गुरुवारी २३ नोहेंबर रोजी पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही महापूजा होईल असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.





