Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
कृष्णराज महाडिक यांनी मनसे कार्यकर्त्यांवर शांततापूर्ण आंदोलनावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. यावेळी आंदोलकांना मारहाण करत चेनस्नॅचिंग झाल्याचे त्यांनी म्हटले. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना रोखले नाही, उलट आंदोलनकर्त्यांनाच ताब्यात घेतल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी तात्काळ एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.
कृष्णराज महाडिक यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शांततापूर्ण आंदोलन करत असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांवर मनसेच्या गुंडांनी हल्ला करून मारहाण केली, तसेच काचेच्या बाटल्या फेकून हिंसक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा दावा महाडिक यांनी केला. या हल्ल्यात आंदोलकांच्या सोन्याच्या चेन स्नॅचिंग झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
महाडिक यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “आम्ही शांततेत आंदोलन करत असताना आम्हाला डिटेन करण्यात आले. पण मनसेचे गुंड आमच्या मुलांना मारहाण करत असताना पोलीस कुठे होते? त्यांना का रोखले नाही?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. मनसेच्या गुंडांवर तात्काळ एफआयआर नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणी महाडिक यांनी केली आहे. जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची नोंद घ्यावी, अन्यथा भविष्यात परिस्थिती अधिक वाईट होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले.
