Narendra Darade | नाशिकच्या राजकारणात मोठी खलबतं! गोकुळ गितेंच्या पाठिंब्यासाठी दराडेंची गुप्त भेट

Narendra Darade | नाशिकच्या राजकारणात मोठी खलबतं! गोकुळ गितेंच्या पाठिंब्यासाठी दराडेंची गुप्त भेट

| Updated on: Jun 09, 2026 | 12:35 PM

नाशिकमध्ये विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे, उमेदवारांच्या विजयासाठी विविध स्तरांवर संपर्क आणि पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू तथा शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी भाजपचे माजी उपमहापौर गणेश गिते यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने किशोर दराडे यांनी गणेश गिते यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासाभराहून अधिक काळ बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार किशोर दराडे यांनी या भेटीमागील उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, “दिपालीताई या आमच्या मतदार आहेत. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासाठी मी त्यांच्याकडे मत मागण्यासाठी आलो होतो. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की त्या युतीचा धर्म पाळतील आणि महायुतीसोबतच राहतील.”

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “गणेश गिते हे देखील उमेदवारीच्या शर्यतीत होते. ही जागा भाजपला मिळणार की शिवसेनेला, याबाबत आधी स्पष्टता नव्हती. मात्र, आता ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे गेल्याने आम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे.” दरम्यान, अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांच्याबाबत बोलताना किशोर दराडे म्हणाले, “गोकुळ गिते हे माझे लहान भाऊ आहेत. मी त्यांचीही भेट घेणार आहे आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्याची विनंती करणार आहे. मात्र, अंतिम निर्णय त्यांचाच असेल.”
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या भेटीगाठी आणि राजकीय चर्चांमुळे नाशिकच्या राजकारणात उत्सुकता वाढली असून, गोकुळ गिते यांची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 09, 2026 12:35 PM
Follow Us