Sanjay Shirsat | 17 जागांवरून महायुतीत चर्चा; शिरसाट म्हणाले तिढा आजच सुटणार, त्या वक्तव्याने चर्चांना उधाण

| Updated on: May 28, 2026 | 3:25 PM

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटप आणि राजकीय घडामोडींना वेग आला असताना शिवसेना नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत, “संजय राऊत कोणत्या नशेत बोलतात देव जाणे. ‘दो हंसो का जोड़ा बिछड गया’ असं ते म्हणतात, पण आज त्या दोन पक्षांचं अस्तित्व तरी कुठे आहे?” असा सवाल केला.

यावेळी शिरसाट यांनी पुढे बोलताना, “ठाकरे आणि पवार यांच्या पक्षाला बुडवण्यात संजय राऊत यांचाच मोठा वाटा आहे,” असा गंभीर आरोपही केला. तसेच विधान परिषद निवडणुकीतील 17 जागांच्या जागावाटपावर बोलताना त्यांनी सांगितलं की, “प्रत्येक पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात असं वाटतं. मात्र तिढा फार मोठा नाही. आज संध्याकाळपर्यंत जागावाटपाचा प्रश्न सुटेल.”
दरम्यान, महायुतीतील जागावाटपाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “तीनही पक्षांचे प्रमुख नेते अधिकृत घोषणा करत नाहीत तोपर्यंत कोणत्याही चर्चेला अर्थ नाही. कोणत्या जागा कुणाला मिळणार यावर एकनाथ शिंदे बोलत आहेत, त्यामुळे त्यावर आम्ही अधिक भाष्य करणं योग्य नाही,” असंही शिरसाट म्हणाले.
दिल्लीतील महायुती नेत्यांच्या मुक्कामावर बोलताना त्यांनी सांगितलं की, “दिल्ली दौऱ्यामागे कांदा प्रश्न, जागावाटप आणि इतर अनेक विषय आहेत. नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली यावर मी भाष्य करणार नाही.”
याशिवाय, मराठा आरक्षण आंदोलनावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “मनोज जरांगे पाटील यांनी 30 तारखेपासून उपोषणाची घोषणा केली आहे. प्रसाद लाड त्यांची भेट घेणार आहेत. सरकार त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करत आहे. सरकार आणि जरांगे यांच्यात चर्चा सुरू असून लवकरच याबाबत निर्णय जाहीर होईल,” अशी माहिती शिरसाट यांनी दिली.

Published on: May 28, 2026 3:21 PM
Follow Us