जरांगेंचं निवडणुकीच्या तोंडावर आमरण उपोषण, आरक्षण नाही तर पाडापाडी
महायुतीचे ११३ आमदार विधानसभा निवडणुकीत पाडणार असल्याचे आव्हान यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा १५ दिवसांत होण्याची शक्यता आहे. तर विधानसभेच्या तोंडावर उपोषणाची घोषणा केल्याने जरांगेंनी सरकारची डोकेदुखी वाढवली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचं अस्त्र बाहेर काढलंय. मनोज जरांगे पाटील हे पुन्हा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. तर निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी शेवटची संधी असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तर निवडणुका घोषित होईपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरूच राहणार आहे. त्यामुळे मराठा कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा, या मुख्य मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आपल्या आमरण उपोषणावर ठाम आहेत. मराठा हे कुणबी असून त्यांच्या नोंदीनुसार सगेसोयऱ्यांनाही ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी आहे. तर या आधी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला निवडणुकीत पाडण्याचा इशारा दिला आहे. मात्र निवडणुकीत उतरू नये, असे वाटत असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी मागण्या मान्य कराव्या, असा इशाराच जरांगे पाटलांनी दिला आहे.