Sandeep Deshpande : मोर्चा होणारच, तुम्ही.. ; पोलिसांच्या कारवाईनंतर संदीप देशपांडे भडकले
Sandeep Deshpande News : मीरा भाईंदर येथे होणाऱ्या मनसेच्या मोर्चा आधीच पोलिसांनी केलेल्या कारवाईवर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उत्तर भारतीय हिंदी भाषिकांनी राज ठाकरे यांच्या विरोधात मीरा-भाईंदरमध्ये काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज मराठी व्यापाऱ्यांचा मोर्चा आयोजित करत आहे. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असून, प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. सोमवार मध्यरात्रीपासून मनसेच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याला भारतीय जनता पक्षाची दडपशाही ठरवत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
देशपांडे यांनी म्हटले की, भाजपने नुकताच आणीबाणीविरोधी दिवस साजरा केला, पण आता मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी नाकारली जात आहे. ही आणीबाणी नाही तर काय? उत्तर भारतीयांना मोर्चासाठी परवानगी मिळते, पण मराठी माणसाला का नाही? त्यांनी दावा केला की, मनसेच्या नेत्यांना अटक झाली तरी सामान्य मराठी माणूस हा मोर्चा यशस्वी करेल. मोर्चा सकाळी 10 वाजता बालाजी हॉटेलपासून सुरू होऊन मिरा रोड स्टेशन परिसरात समाप्त होणार आहे.
देशपांडे यांनी पोलिसांच्या कारवाईला दडपशाही ठरवत म्हटले, गुजराती व्यापाऱ्यांना मोकळीक दिली जाते, पण मराठी माणसाला तुरुंगात डांबले जाते. याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. त्यांनी भाजपवर आरोप केला की, मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण करून आगामी निवडणुकांमध्ये राजकीय फायदा घेण्याचा त्यांचा डाव आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे बिहारमधून बसून महाराष्ट्रात अशांतता पसरवत आहेत. भाजपने दंगली घडवूनच निवडणुका जिंकल्या आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

