कांद्याचे भाव घसरले! आक्रमक शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले

| Updated on: Feb 25, 2026 | 1:38 PM

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर 500 ते 800 रुपयांपर्यंत घसरल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले असून, 3 हजार रुपये हमीभाव आणि 1500 रुपये अनुदान देण्याची मागणी केली आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

कांद्याचं आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे सरासरी दर 1 हजारच्या खाली म्हणजे 500 ते 600 पर्यंत आल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आज त्यांना 500 ते 600 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे, तर चार दिवसांपूर्वी हाच दर  11 रुपये प्रति किलो (1100 रुपये प्रति क्विंटल) होता, जो आता अवघ्या 7 रुपये  प्रति किलो (700 रुपये प्रति क्विंटल) झाला आहे.

कांद्याला 3 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्यासच शेती परवडेल, असे शेतकरी सांगतात. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी खूप अडचणीत आले आहेत. सरकारच्या धोरणांमुळे, विशेषतः व्यापाऱ्यांची निर्यात सबसिडी 50% नी कमी केल्याने, बाजारभाव पडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी आता कमी भावात विकल्या गेलेल्या कांद्यासाठी  1500 रुपये अनुदान आणि 3 हजार रुपये हमीभावाची मागणी केली आहे.

Published on: Feb 25, 2026 01:38 PM