Parth Pawar Land Deal : दादा गडबडीत आले अन् निघून गेले, मुलावरील जमीन घोटाळ्याच्या आरोपावर सवाल करताच…..
अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अलमेडा कंपनीवर मुळशीतील जमीन व्यवहार गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. १८०० कोटींची जमीन फक्त ३०० कोटींना खरेदी केल्याचा दावा आहे. याबाबत पत्रकारांनी विचारल्यावर अजित पवारांनी मौन बाळगले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या कसून चौकशीचे आदेश दिले असून, दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया AMADEA नावाच्या कंपनीवर जमीन खरेदी प्रकरणी गंभीर आरोप झाले आहेत. पुण्याच्या कोरेगाव आणि मुळशी परिसरात ४० एकर जमीन, ज्याची अंदाजित किंमत १८०० कोटी रुपये आहे, ती केवळ ३०० कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, या व्यवहारासाठी फक्त ५०० रुपये स्टॅम्प ड्युटी भरल्याचा दावा अंबादास दानवे यांच्यासह विरोधकांनी केला आहे. या गंभीर आरोपांवरून पत्रकारांनी अजित पवार यांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यावर बोलणं टाळलंय.
एका कार्यक्रमातून पक्षाच्या बैठकीसाठी जात असताना पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारले. मात्र, अजित पवारांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले आणि ते थेट बैठकीला निघून गेले. त्यांनी माध्यमांशी बोलणे पूर्णपणे टाळल्याचे दिसून आले. राजकीय वर्तुळात या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. या व्यवहाराशी संबंधित एका तहसीलदारालाही निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

