Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट सोडण्याच्या निर्णयाबाबत पहिल्यांदाच सविस्तर भूमिका मांडली आहे. हा निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा वाटत असला तरी राजकीयदृष्ट्या योग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतदारसंघाच्या विकासासाठी आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागल्याचा दावा त्यांनी केला.
ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट सोडण्याच्या निर्णयाबाबत पहिल्यांदाच सविस्तर भूमिका मांडली आहे. हा निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा वाटत असला तरी राजकीयदृष्ट्या योग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतदारसंघाच्या विकासासाठी आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागल्याचा दावा त्यांनी केला.
माध्यमांशी बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले की, “मी मोठ्या धर्मसंकटात आहे. भावनिकदृष्ट्या विचार केला तर हे पाऊल चुकीचे वाटते. मात्र राजकीयदृष्ट्या विचार केला तर तेच योग्य आहे. माझ्यासमोर राजकीय अस्तित्वाचे संकट निर्माण झाले होते.”
त्यांनी सांगितले की, खासदार असूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतःची माणसं निवडून येत नसतील, तर भविष्यात राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते. मतदारसंघातील रस्ते, पूल, डीपी आणि इतर विकासकामांसाठी वारंवार प्रस्ताव देऊनही अपेक्षित कामे होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सत्ता आणि निधीच्या अभावामुळे जनतेची कामे करता येत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून मोठा दबाव असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र वडील पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षांतरासाठी पैसे घेतल्याच्या तसेच वाय प्लस सुरक्षा मिळाल्याच्या चर्चांचे त्यांनी खंडन केले. “या सर्व चर्चा पूर्णपणे खोट्या आहेत. माझा निर्णय केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. “दोन्ही नेते सतत कार्यकर्त्यांमध्ये फिरतात आणि मोठ्या प्रमाणात मेहनत घेतात,” असे ते म्हणाले.
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांना आरोग्याच्या कारणामुळे सक्रियपणे फिरणे शक्य नसल्याचे सांगतानाच, आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रिय भूमिका घ्यायला हवी होती, अशी अप्रत्यक्ष नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय चर्चांना आणखी वेग आला असून, ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jun 19, 2026 02:53 PM
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले

