Unseasonal Rain | मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा
राज्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या तीव्र उकाड्यानंतर अखेर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबई, कोकण, सोलापूरसह राज्यातील विविध भागांत जोरदार पाऊस पडत असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या तीव्र उकाड्यानंतर अखेर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबई, कोकण, सोलापूरसह राज्यातील विविध भागांत जोरदार पाऊस पडत असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार झालं असून पुढील तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. दादर, मुलुंड, बांद्रा आणि सांताक्रूज परिसरात रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या. तसेच मीरा-भाईंदर शहरातही अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे तापमानात घट झाली असून नागरिकांना उकाड्यापासून तात्काळ दिलासा मिळाला आहे.
मात्र दुसरीकडे या पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे उत्तर पुणे, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये शेती आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून वीजपुरवठाही विस्कळीत झाला आहे. प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे.
