राजू शेट्टी यांचा इंडिया आघाडीच्या बैठकीवर बहिष्कार, हे कारण देत म्हणाले ‘अशा लोकांसोबत आम्ही…’
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी हे मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार की नाही याची चर्चा रंगली होती. मात्र, या चर्चांना पूर्णविराम देत राजू शेट्टी यांनी कॉंग्रेसवर टीका केली.
सांगली 30 ऑगस्ट 2023 | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी हे मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नाहीत. इंडियामध्ये सामील होण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा फोन आला होता. पण, 2021 ला महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. उसाची एफआरपी देण्याचा आणि दुसरा भूमिअधिग्रहन कायद्याचा. शेतकऱ्यांवर अन्यायकारक असे हे दोन निर्णय होते. त्यामुळे महाविकास आघाडीसोबत असलेले सगळे संबंध तोडले होते. आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आमचे म्हणणं काय आहे याची साधी चौकशी आघाडीच्या नेत्यांनी केली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही राजकारण करतो आणि जिथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची गॅरंटी मिळत नाही. अशा लोकांसोबत आम्ही थांबत नाही, अशी टीका राजू शेट्टी यांनी कॉंग्रेसवर केली.

