Video | आपण एकटेच आहोत, उद्या निवडणूका, तयारीला लागा.. रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने पुन्हा खळबळ

| Updated on: Nov 26, 2022 | 2:29 PM

कामाख्या देवीच्या दर्शनाहून शिंदे परतले की सरकार पडणार असं भाकित ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनीही केलंय. त्यामुळे राजकीय अस्थिरतेचे हे संकेत आहेत की काय, अशी चर्चा सुरु आहे

Video | आपण एकटेच आहोत, उद्या निवडणूका, तयारीला लागा.. रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने पुन्हा खळबळ
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नजीर खान, परभणीः केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवेनी (Raosaheb Danve) मध्यावधी निवडणुकांचे संकेत असलेलं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली. शुक्रवारी आणखी एका कार्यक्रमात त्यांनी याच संदर्भाने वक्तव्य केलं. आपण एकटेच आहोत, असे समजा.. उद्या निवडणुका (Assembly Election) आहेत असे समजून कामाला लागा, असं आवाहन त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिलं. एकिकडे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये शिंदे-भाजप (Shinde-BJP) युती होणार असल्याचं दिग्गज नेते सांगत आहेत. तर रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शुक्रवारी गंगाखेडमध्ये भाजप नेते संतोष मुरकुटे यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार प्रतापराव चिखलीकर उपस्थित होते. भाजप कार्यकर्त्यांना उद्देशून रावसाहेब दानवे म्हणाले, भाजप वाढली नाही, कारण की पंचवीस तीस वर्ष आमच्या बापाला लढायला भेटलं नाही.. ना झेडपी, ना पंचायत समिती, ना आमदारकी ना खासदारकी… तर पक्ष वाढेल कसा?

मात्र आता आपण एकटेच आहोत. तयारीला लागा उद्या निवडणूक आहे असं समजून कमाला लगा, निवडणूका वेळेवर होतील. मात्र तुम्ही उद्या निवडणूक आहे असं समजून तयारीला लागा. आम्ही ज्या दिवशी निवडून येतो त्या दिवसापासून पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागतो. म्हणून नेहमी नेहमी आम्ही निवडून येतो.

विशेष म्हणजे याच कार्यक्रमात भाजपने मोठी घोषणा केली. कार्यक्रम झाला तिथे राष्ट्रीय समाज पार्टीचे उमेदवार रत्नाकर गुट्टे हे आमदार आहेत. अनेक वर्षांपासून भाजप रासपा युती आहे. मात्र शुक्रवारच्या कार्यक्रमात संतोष मुरकुटे यांच्या उमेदवारीबद्दल रावसाहेब दानवे आणि डॉ. भागवत कराड या दोघांनीही सूतोवाच केलं. त्यामुळे रासपा-भाजपा युती मोडणार, असे चिन्ह दिसले.

येत्या दोन महिन्यात शिंदे-भाजप सरकार पडेल, अशी भाकितं विरोधकांकडून केली जात आहेत. त्यात खुद्द भाजपचे मंत्री रावसाहेब दानवेंनीच काही दिवसांपूर्वी राजकीय अस्थिरतेबाबत वक्तव्य केलं. हेच वक्तव्य हेरत संजय राऊतांनीही शिंदे सरकार १०० % पडणार असं म्हटलं होतं. आजदेखील एकनाथ शिंदे आमदार-खासदारांसह गुवाहटीला गेले आहेत. कामाख्या देवीच्या दर्शनाहून शिंदे परतले की सरकार पडणार असं भाकित ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी केलंय. त्यामुळे राजकीय अस्थिरतेचे हे संकेत आहेत की काय, अशी चर्चा सुरु आहे.