मविआकडून शरद पवारच उमेदवार; ठाकरेंचा पाठिंबा, सुळेंची घोषणा
महाविकास आघाडीने राज्यसभेसाठी शरद पवारांच्या उमेदवारीला अधिकृत पाठिंबा दिला आहे, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने ही घोषणा केली. भाजपनेही विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते आणि रामराव वडकुते या चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामुळे महाराष्ट्रातील राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीने अखेर राज्यसभेच्या एका जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्षाने अधिकृतपणे पवारांच्या नावाला समर्थन दिल्यानंतर, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेनेही त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले. यामुळे महाविकास आघाडीतील सस्पेन्स संपुष्टात आला आहे.
दुसरीकडे, महायुतीमधील भाजपनेही राज्यसभेसाठी आपले चार उमेदवार जाहीर केले आहेत. यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते आणि धनगर समाजाचे नेते रामराव वडकुते यांचा समावेश आहे. भाजपने माया इवनाते आणि रामराव वडकुते यांच्या माध्यमातून नवे चेहरे देऊन सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातून सात जागांसाठी होणारी ही निवडणूक महाविकास आघाडीकडून एक आणि महायुतीकडून सहा उमेदवार असल्याने बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
