दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही, त्याला… सुनील तटकरेंनी काँग्रेसला सुनावले खडेबोल
सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टवरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर जोरदार टीका केली.

सुनील तटकरे म्हणाले, “सुनेत्रा पवारांसंदर्भातील काँग्रेसच्या पोस्टचा मी निषेध करतो. काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली. त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या संतप्त भावना व्यक्त करत आहेत. काल रात्री उशिरा काँग्रेसने दिलगिरी व्यक्त केली. पण दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही. काहीवेळेला काय बोलायचं याचं भान असावं लागतं. दुर्देवाने काँग्रेसचं राज्य पातळीवरील नेतृत्व ते विसरलेलं दिसतय.” काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश करत गोंधळ घातला होता. त्यानंतर आज तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
तटकरे म्हणाले, “काँग्रेसने टीका केली त्यामागचं एकच कारण आहे, दादांच्या अकाली निधनानंतर दादांबद्दल असलेल्या भावना, दादांची प्रथम जयंती राज्यात पक्षापलीकडे जाऊन नागरिकांनी, शेतकऱ्यांनी साजरी केली. आज वहिनी ज्या पद्धतीचं काम करतायत त्यामुळे काँग्रेसच्या भवितव्याची चिंता असणारी मंडळी अशी टीका टिप्पणी करत राहणार. आम्ही काम करत राहू.”