Kolhapur | चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर लिंबू-अंगारा! निवडणुकीत विजयासाठी अंधश्रद्धेचा खेळ?
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान कोल्हापुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी केंद्राबाहेरील एका खुर्चीवर लिंबू, अंगारा आणि अगरबत्ती ठेवण्यात आल्याचे आढळून आले. या घटनेमुळे मतमोजणी केंद्र परिसरात काही काळ खळबळ उडाली असून, अंधश्रद्धेशी संबंधित चर्चांना उधाण आले आहे.

जवळपास दशकभरानंतर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक पार पडत असून, यंदाची निवडणूक विविध वादांमुळे आधीपासूनच चर्चेत होती. कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने यंदा केवळ 49.90 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
महामंडळाच्या 17 जागांसाठी ही निवडणूक होत असून, त्यापैकी तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अभिनेत्री वर्षा उसगावकर, संगीत क्षेत्रातील आनंद शिंदे आणि विजय खोचीकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित 14 जागांसाठी 44 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
निवडणुकीदरम्यान राजकीय हस्तक्षेपाचे आरोपही समोर आले होते. अभिनेते विजय पाटकर यांनी काही व्यक्तींनी राजकारण करून उमेदवारी प्रक्रियेत अडथळे आणल्याचा आरोप केला होता. तसेच एका मंत्र्यांच्या ओएसडीकडून दबाव टाकला जात असल्याचाही दावा त्यांनी केला होता.
दरम्यान, कोल्हापूर येथील राम गणेश गडकरी सभागृहात मतमोजणी प्रक्रिया पार पडत असून, निकालाकडे संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे. मतमोजणी केंद्राबाहेर आढळलेल्या अंधश्रद्धेच्या प्रकारामुळे मात्र या निवडणुकीला आणखी एक नवे वादग्रस्त वळण मिळाले आहे.