Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी प्रकरणात सुशीलला गोवण्यात आलं? हगवणेंची मोठी सून नेमकं काय म्हणाली?
वैष्णवी हगवणे प्रकरणात माझ्या नवऱ्याचा काही संबंध नव्हता. आम्ही वेगळे राहत होतो. माझ्या नवऱ्याला या प्रकरणात गोवण्यात आलं आहे, असं सुशील हगवणेची बायको मयुरी जगताप हिने म्हटलं आहे. टीव्ही9शी बोलताना तिने ही प्रतिक्रिया दिली.
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे गेले सात दिवस फरार होते. त्यांना अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. यानंतर हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी जगताप हगवणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘या प्रकरणात जो कोणी मुख्य सूत्रधार आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई पोलिसांकडून करण्यात येईल’, अशी अपेक्षा मयुरी हगवणे यांनी व्यक्त केली. सुशील हगवणेला या प्रकरणात गोवण्यात आलं का? असा सवाल करताच तिने होय असं उत्तर दिलं. माझ्या नवऱ्याला यात गोवण्यात आलं आहे. त्यांचा या प्रकरणाशी कोणताही सहभाग नाही. माझा अख्खा संसार वेगळा होता. त्याचा काहीही सहभाग नव्हता तरी त्याला यात ओढण्यात आलं आहे. मी जरी तिथे असते तर माझंही नाव यामध्ये या लोकांनी टाकलं असतं. मी ज्यावेळी हगवणे कुटुंबाची तक्रार पोलिसात दिली. त्यावेळी कारवाई करण्यात आली असती किंवा हे प्रकरण दाबलं गेलं नसतं तर आज वैष्णवी आपल्यात असती, असंही मयुरी हगवणे यांनी म्हटलंय.