Vijay Wadettiwar : राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण तोडून खाताना दिसतील; वडेट्टीवारांचा टोला
Vijay Wadettiwar On Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांनी हलाल मटणावर केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. त्याच पार्श्वभमीवर आज कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील राणे यांच्यावर निशाणा साधला.
नितेश राणे हा संधीसाधू माणूस आहे. त्याला पुढचा योगी व्हायचं आहे, की जोगी व्हायचं आहे माहीत नाही. पण भाजपच्या प्रस्थापित नेत्यांना याच्यामुळे धोक्याचीच घंटी आहे, अशी टीका कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली आहे. नितेश राणे यांनी हलाल मटणावर केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वांकडून जोरदार टीका केली जात आहे. त्याच पार्श्वभमीवर आज वडेट्टीवार यांनी देखील राणे यांच्यावर निशाणा साधला.
पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, नितेश राणे यांचे जुने व्हिडिओ काढून बघा, त्यात हे हलाल केलेलं मटणच दाबून खाताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे वडील देखील आहेत. रमजानच्या ईद मिलन समारंभात त्यांनी मटण तोडल्याचे व्हिडिओ देखील आहेत. मग याचा अर्थ काय समजावा? सोयीनुसार विष पेरण्याचं काम तुम्ही करत असाल तर यांना लोकशाही मानायची नाही असाच याचा अर्थ होतो. त्यामुळे अशा प्रवृत्तीमुळे देशाचा लवकरच तालिबान होणार आहे, अशीही टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.