ठाकरे सरकारकडून पीक विम्याबाबत शेतकऱ्यांची फसवणूक, माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा आरोप

उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं निकष बदलल्यामुळं शेतकऱ्यांना कमी प्रमाणात नुकसानभरपाई मिळाल्याचं देखील अनिल बोंडे म्हणाले. ( Anil Bonde Crop Insurance )

ठाकरे सरकारकडून पीक विम्याबाबत शेतकऱ्यांची फसवणूक, माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा आरोप
अनिल बोंडे

अमरावती: महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची लूट करुन विमा कंपन्या मालामाल केल्या आहेत. भाजप नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी हा आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं निकष बदलल्यामुळं शेतकऱ्यांना कमी प्रमाणात नुकसानभरपाई मिळाल्याचं देखील अनिल बोंडे म्हणाले. (BJP Leader Anil Bonde accused Thackeray Government cheating farmers in Crop Insurance Scheme )

अनिल बोंडे यांचा नेमका आरोप काय?

खरिप 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसाच्या सरकारनं पीक विमा कंपन्या सोबत केलेल्या करारानुसार 85 लाख शेतकऱ्यांना 5795 कोटी रुपयाचा लाभ मिळाला होता. परंतु 2020 च्या खरिप हंगामाकरिता उद्धव ठाकरे सरकारनं विम्याचे निकष बदलले. उंबरठा उत्पादन कमी केले आणि त्यामुळे महाराष्ट्रात खरिप 2020 मध्ये फक्त 743 कोटी रुपये पीक विमा नुकसानभरपाई वाटप आज पर्यंत शेतकऱ्यांना करण्यात आली, असं अनिल बोंडे म्हणाले.

विमा कंपन्यांना 4234 कोटींचा नफा

विमा कंपन्यांना मात्र उद्धव ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने 4234 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, असा खळबळजनक आरोप भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस अनिल बोंडे अमरावतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

पीक विमा योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असल्यास तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करता येईल. राज्य सरकारकडून खरिप आणि रब्बी हंगामासाठी जाहिरात दिली जाते. या योजनेसाठी अर्ज करणं हे ऐच्छिक असून बंधनकार नाही. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अर्ज तुम्हाला बँकेच्या शाखेमध्ये उपलब्ध होईल किंवा विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल. pmfby.gov.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करता येईल.

विमा योजनेसाठी कोणती कागदपत्रं लागतात

अर्जदार शेतकऱ्याचा फोटो, ओळखपत्राचा पुरावा,शेतीची कागदपत्र, शेतात पेरणी किंवा लागवड केल्याचं पुरावा हा दाखला सरपंचाकडून घेऊ शकता.

कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी

गेल्या काही दिवसांमध्ये 9 लाख 30 हजार शेतकऱ्यांचे दावे फेटाळण्यात आले होते. यामुळं शेतकऱ्यांनी काही गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती आल्यास नुकसानीचे दावे करण्याची गरज नसते. मात्र, अतिवृष्टी, वादळ, ढगफुटी, अवकाळी पाऊस या संकंटांच्या वेळी पीक काढल्यानंतर झालेल्य नुकसानीची पाहणी विमा उतरवलेल्या क्षेत्राच्या आधारावर केली जाते. त्यासाठी अशावेळी शेतकऱ्यांना नुकसानीबद्दल माहिती द्यावी लागते.

संबंधित बातम्या:

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा 52 लाख शेतकऱ्यांना फायदा, केंद्र सरकारकडून ‘या’ वर्षाची आकडेवारी जाहीर

मार्केटिंग ऑफिसरची नोकरी सोडून शेतकरी बनला, आज लाखो रुपये कमावतो

(BJP Leader Anil Bonde accused Thackeray Government cheating farmers in Crop Insurance Scheme )