
कृषीमंत्री शिवरासिंह चौहान विकसित कृषी संकल्प अभियानाची उद्या गुजरातमध्ये सांगता करणार आहेत. यावेळी ते हजारो शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. सुरत जिल्ह्यातील बारडोली येथे या अभियानाची सांगता होणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल देखील याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
१५ दिवसांचे अभियान
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह यांच्या उपस्थितीत २९ मे रोजी ओडिशा येथून या १५ दिवसांच्या देशव्यापी मोहिमेला सुरुवात झाली होती. या मोहिमेअंतर्गत शिवराज सिंह यांनी आतापर्यंत ओडिशा, जम्मू, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, उत्तराखंड, पंजाब, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि दिल्ली येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. आता १२ जूनला ते गुजरातमधील शेतकऱ्यांना भेटणार आहेत
शिवराज सिंह शेतकऱ्यांचे प्रश्न आणि समस्या ऐकणार
सांगता समारंभाच्या कार्यक्रमापूर्वी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह किसान चौपालमध्ये सामील होऊन शेतकऱ्यांचे प्रश्न आणि समस्या वैयक्तिकरित्या ऐकणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान देशभरातील १६ हजार शास्त्रज्ञांच्या २१७० टीम व्हर्च्युअल पद्धतीने सामील होतील. आतापर्यंत या टीम्स विकासित कृषी संकल्प अभियान कार्यक्रमाद्वारे एक कोटी आठ लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन
कृषी विभागाच्या या टीम्सद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्राच्या गरजा, हवामान परिस्थिती, मातीची सुपीकता आणि इतर घटक लक्षात घेऊन प्रगत शेतीसाठी केलेल्या संशोधनाची माहिती दिली जात आहे. यासोबतच शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून त्यांच्या व्यावहारिक समस्या आणि गरजांवर उपाय शोधण्याचा प्रयत्नही केला जात आहे.या माहितीचा फायदा भविष्यातील कृषी संशोधनाची दिशा आणि धोरणे ठरवण्यासाठी होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी नवा कायदा आणणार
आज झालेल्या दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना शिवरासिंह चौहान यांनी म्हटले की, ‘बनावट बियाणे, बनावट खतं आणि बनावट औषधांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. मात्र आता आम्ही याविरुद्ध नवा कडक कायदा आणत आहोत.सध्या बनावत औषधांची विक्री केल्यास दंड भरून सोडून दिले जाते. मात्र आता नव्या कायद्यात कडक शिक्षेची तरतूद असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्याला शिक्षा नक्कीच होणार आहे.